Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:10 IST2025-09-24T15:10:08+5:302025-09-24T15:10:33+5:30
Volvo EX30 launched in India: वोल्वो कार इंडियाने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही कार वोल्वो एक्स ३० भारतात लॉन्च केली.

Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
वोल्वो कार इंडियाने त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही कार वोल्वो एक्स ३० भारतात लॉन्च केली. आकर्षक लूक, टिकाऊपणा आणि शक्तिशाली बॅटरी असलेल्या या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची किंमत ४१ लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, १९ ऑक्टोबर २०२५ पूर्वी प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ती ३९.९९ लाख रुपयांच्या विशेष सवलतीच्या दरात मिळेल.
ही कार पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. या कारची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. वोल्वोची ही तिसरी इलेक्ट्रिक कार असून, ती बेंगळुरूमधील होस्कोट येथील कंपनीच्या प्लांटमध्ये असेंबल केली जात आहे. भारतीय बाजारात ही कार फक्त मोठ्या ६९ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे.
डब्लूएलटीपी प्रमाणानुसार, ही एसयूव्ही एका चार्जमध्ये ४८० किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. बॅटरी मागील एक्सलवरील इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देते, जी २७२ एचपी आणि ३४३ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार फक्त ५.३ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग पकडू शकते आणि तिचा कमाल वेग १८० किमी/ताशी आहे.
कारसोबत ११ किलोवॅटचा वॉलबॉक्स चार्जर मिळतो, ज्यामुळे बॅटरी ० ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी साधारणपणे ७ तास लागतात. कंपनी बॅटरीवर ८ वर्षे किंवा १,६०,००० किमीची वॉरंटी देत आहे. याशिवाय, ३ वर्षांची वाहन वॉरंटी, ३ वर्षांचे वोल्वो सर्व्हिस पॅकेज आणि ३ वर्षांची रोडसाईड असिस्टन्स देखील मिळत आहे. ५ वर्षांचे मोफत डिजिटल सर्व्हिस सबस्क्रिप्शन, ‘कनेक्ट प्लस’ देखील दिले जात आहे. वोल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक ज्योती मल्होत्रा यांनी दावा केला आहे की, ही कार आकर्षक डिझाइन, पॉवर आणि लक्झरी यांचा उत्तम संगम आहे, ज्यामुळे ती ग्राहकांना आकर्षित करेल.