भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:24 IST2025-12-15T16:24:16+5:302025-12-15T16:24:47+5:30
Volkswagen VRS India 2300 Workers: कंपनी भारतीय बाजारपेठेत गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असूनही, तिचा बाजार हिस्सा केवळ २ टक्क्यांवर स्थिर आहे.

भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
जगातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपन्यांमध्ये असलेली जर्मन कार उत्पादक कंपनी फॉक्सवॅगन ग्रुपने भारतीय बाजारपेठेत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने पुण्यातील चाकण येथील उत्पादन प्रकल्पांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल २,३०० कर्मचाऱ्यांसाठी 'स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना' देऊ केली आहे.
कंपनी भारतीय बाजारपेठेत गेली दोन दशकांहून अधिक काळ कार्यरत असूनही, तिचा बाजार हिस्सा केवळ २ टक्क्यांवर स्थिर आहे. तसेच, दोन्ही प्लांट त्यांची पूर्ण उत्पादन क्षमता वापरू शकत नसल्यामुळे, मनुष्यबळ आणि सध्याच्या गरजांमध्ये समन्वय साधण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. महत्वाची बाब म्हणजे फोक्सवॅगनने गेल्या वर्षीपासून जर्मनीतील बरेच प्लांट बंद केले आहेत. आता त्यांनी इतर देशांकडे आपला मोर्चा वळविला आहे.
फॉक्सवॅगन ग्रुपच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून युनियनसोबत याबाबत चर्चा सुरू होती. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसारच ही व्हीआरएस योजना लागू करण्यात आली आहे.
या दोन्ही प्लांट्समध्ये स्कोडा कुशाक, फॉक्सवॅगन व्हर्टस सेडान आणि ऑडी क्यू-३ व क्यू-५ यांसारख्या कारचे उत्पादन देशांतर्गत विक्री आणि निर्यात बाजारपेठेसाठी केले जाते. मात्र, सध्या हे युनिट्स पूर्ण क्षमतेपेक्षा कमी क्षमतेवर सुरू आहेत. या योजनेचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या फायद्यासोबतच परिचालन कार्यक्षमता वाढवणे आणि मनुष्यबळ सध्याच्या उत्पादन गरजांनुसार संतुलित करणे हा आहे.
VRS अंतर्गत काय मिळणार?
'VRS' स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे. सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी ७५ दिवसांचे वेतन दिले जाईल. किंवा, निवृत्तीपर्यंतच्या उर्वरित वर्षांचे वेतन दिले जाईल. यापैकी जी रक्कम कमी असेल ती यामध्ये गृहीत धरण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी ही ऑफर ५ ते १० दिवसांच्या आत स्वीकारल्यास त्यांना अतिरिक्त बोनस देखील दिला जाईल. कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही योजना पूर्णपणे 'स्वैच्छिक' असून, यामुळे कंपनीचे प्लांट बंद होणार नाहीत. विक्रीत वाढ होऊनही, फॉक्सवॅगन ग्रुप सध्या ‘मैनपावर रेशनलायझेशन'वर लक्ष केंद्रित करत आहे.
फोर्डच्या वाटेवर?
काही वर्षांपूर्वी अमेरिकन कंपनी फोर्डने देखील बिझनेस रिस्ट्रक्चर करण्याच्या नावाखाली जवळपास २० वर्षांनंतरही विक्री सुधारलेली नाही म्हणून भारतातून एक्झिट घेतली होती. फोक्सवॅगनने जर्मनीतील ७-८ प्लांटपैकी ५-६ प्लाँट बंद केले आहेत. फोक्सवॅगनने सध्यातरी कंपनी उत्पादन प्रकल्प बंद करणार नाहीय असे कळविले असले तरी आयात कर वाचविण्यासाठी सुट्या भागांची आयात केल्याचे आणि भारतात महागड्या कार असेंबल केल्याची प्रकरणे कोर्टात गेली आहेत. यामुळे कंपनीच्या या व्हीआरएसच्या ऑफरकडे संशयाने पाहिले जात आहे.