ट्रक, टेम्पोमधून प्रवास करताय? अपघातानंतर एक छदामही मिळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:47 IST2018-11-12T17:47:06+5:302018-11-12T17:47:46+5:30
रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो.

ट्रक, टेम्पोमधून प्रवास करताय? अपघातानंतर एक छदामही मिळणार नाही
मद्रास : रस्ते अपघातात प्राण गमावल्यास विमा कंपन्यांनी 10 लाख-15 लाखांची भरपाई दिल्याची किंवा न्यायालयाने त्यांना देण्यास लावल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचत असतो. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक असा निर्णय दिला आहे, ज्याद्वारे केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवाशांच्या नातोवाईकांनाच विम्याची भरपाई मिळू शकणार आहे.
बऱ्याचदा विमा कंपन्या मृत्यू किंवा जखमी झाल्यानंतर विम्याची रक्कम देणे नाकारतात. यामुळे अशी प्रकरणे न्यायालयात जातात. यावेळी न्यायालये या कंपन्यांना विम्याची रक्कम देण्याचे आदेश देतात. मात्र, मद्रास न्यायालयात आलेल्या खटला काहीसा विचार करायला लावणारा आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनामधून प्रवास करताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे माल वाहतूक करणाऱ्य़ा वाहनातून प्रवास करतेवेळी अपघातात मृत्यू किंवा जखमी झाल्यास ती व्यक्ती विम्याची रक्कम मिळण्यास पात्र राहत नसल्याचा आदेश न्यायालयाने दिला.
हा निर्णय बेंगळुरुच्या भारती AXA जनरल इन्शुरन्स कंपनीच्या बाजुने देण्यात आला. मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलने या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई देण्याचे आदेश दिले होते. या विरोधात कंपनी उच्च न्यायालयात गेली होती.
घटना काय होती?
1 सप्टेंबर 2011 मध्ये एका मालवाहतूक वाहनामधून 16 जण तामिळनाडूच्या कोटापट्टी गावाहून सोलानकुरुचीला जात होते. यावेळी वाहनाला अपघात झाला. यामध्ये काही जण ठार झाले तर काही जखमी झाले. त्यांच्या कुटुंबियांनी मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलकडे धाव घेत भरपाई मिळण्याची मागणी केली. ती मान्य करत कंपनीला ट्रिब्युनलने भरपाई देण्याचे आदेश दिले होते.