तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:52 IST2025-11-09T12:51:59+5:302025-11-09T12:52:38+5:30
Car Perfume Side Effect: परफ्यूममध्ये दडलेल्या हानिकारक रसायनांमुळे श्वासोच्छ्वास आणि मज्जातंतूंशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे असे करत असाल तर वेळीच सावध व्हा.

तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
आपली कार आतून स्वच्छ आणि सुवासिक ठेवण्यासाठी अनेकजण सर्रासपणे कार परफ्यूम किंवा एअर फ्रेशनरचा वापर करतात. परंतू, बाजारात मिळणारे हे सुवासिक फ्रेशनर्स तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात? या परफ्यूममध्ये दडलेल्या हानिकारक रसायनांमुळे श्वासोच्छ्वास आणि मज्जातंतूंशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे असे करत असाल तर वेळीच सावध व्हा.
कार परफ्यूममध्ये कृत्रिम सुगंधांसह VOCs आणि Phthalates सारखी हानिकारक रसायने मोठ्या प्रमाणात असतात. जेव्हा कारचे केबिन बंद असते, विशेषतः उन्हाळ्यामध्ये, तेव्हा ही रसायने हवेत वेगाने पसरतात आणि केबिनच्या आत जमा होतात.
या रसायनांचा सतत संपर्क श्वसनमार्गात जळजळ निर्माण करतो. त्यामुळे शिंका येणे, नाक वाहणे आणि डोळ्यांतून पाणी येणे यांसारख्या ॲलर्जी सुरू होतात. दमा किंवा सीओपीडी सारखे श्वसनाचे आजार असलेल्या लोकांसाठी हे परफ्यूम अत्यंत घातक ठरू शकतात. बाहेरील प्रदुषणामुळे असे होते असे आपल्याला वाटू लागते. परंतू, ते कारमधील या परफ्युममुळे होत असते.
परफ्यूमचा तीव्र आणि कृत्रिम वास अनेक लोकांना गंभीर डोकेदुखी किंवा मायग्रेनचा झटका देऊ शकतो. याशिवाय, त्वचेवर पुरळ, खाज किंवा जळजळ निर्माण करून त्वचा ॲलर्जी किंवा एक्झिमा होण्याचा धोकाही असतो. काही अल्कोहोल-आधारित एअर फ्रेशनर्स अति उष्णतेत आग लागण्याचा किंवा ज्वलनशील होण्याचा धोकाही निर्माण करतात.
सुरक्षित पर्याय काय?
तज्ज्ञांच्या मते, कारमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी कृत्रिम फ्रेशनरऐवजी नैसर्गिक व्हेंटिलेशन, कारचे फिल्टर नियमित बदलणे किंवा एसेंशियल ऑइल्सचा मर्यादित आणि सुरक्षित वापर करणे हे अधिक चांगले आणि आरोग्यदायी पर्याय आहेत.