असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:01 IST2025-10-01T14:01:38+5:302025-10-01T14:01:58+5:30
Auto Sale GST Reforms September 2025: मारुती तर दोन लाख टच करणार होती, महिंद्रा, ह्युंदाईचीही विक्री वाढली. मग असे कसे झाले... वाहन उद्योगासाठी सप्टेंबर महिना निराशाजनक ठरला आहे.

असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्टला जीएसटीमध्ये कपात करणार असल्याची घोषणा केली होती. जीएसटीच्या बैठकीत २ सप्टेंबरला निर्णयही घेण्यात आला, २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी बदल लागू होणार होते. यामुळे साबण, टुथपेस्ट, औषधांसह वाहनांच्याही किंमती कमी होणार होत्या. याचा फायदा ऑटोमोबाईल क्षेत्राला होणार होता. परंतू, सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्रीच घसरल्याचे समोर आले आहे.
वाहन उद्योगासाठी सप्टेंबर महिना निराशाजनक ठरला आहे. सुरुवातीचे तीन आठवडे ग्राहक जीएसटी दरांमध्ये कपातीची वाट पाहत होते, तसेच ‘पितृपक्षा’मुळे खरेदीचे प्रमाण कमी होते. यामुळे एकूण वाहन विक्रीत १३% घट नोंदवली गेली. वाहन पोर्टलच्या (वाहन) आकडेवारीनुसार, मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत १५.१ लाख युनिट्सचे रजिस्ट्रेशन झाले, जे गेल्या वर्षी याच काळातील १७.४ लाख युनिट्सपेक्षा १३.२८% कमी आहे. वाहन उद्योग तज्ज्ञांच्या मते, हे आकडे केवळ रजिस्ट्रेशनचे आहेत, तर प्रत्यक्ष डिलिव्हरीचा प्रभाव काही दिवसांनी दिसतो. म्हणजेच, सप्टेंबरच्या काही विक्री ऑक्टोबरच्या आकड्यांमध्ये सामील होऊ शकतात.
वाहन खरेदी केले की ते साधारण आठवड्याभराने डिलिव्हर केले जाते. जीएसटी कपात २२ सप्टेंबरला लागू झाली. ३० दिवसांचा हा महिना होता. यामुळे बँक लोन, आरटीओ रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स आदी प्रक्रियेला वेळ लागतो. २२ सप्टेंबरनंतर जी वाहने विक्री झाली किंवा बुक केली गेली ती १ ऑक्टोबरपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. आरटीओचे रजिस्ट्रेशन हे बुक केल्यानंतर दोन-चार दिवसांत होते. नंतर नंबर प्लेट येण्यास वेळ लागतो. म्हणजे साधारण २६-२७ सप्टेंबरपासून ज्यांनी गाड्या खरेदी केल्या आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन ऑक्टोबरमध्ये नोंदविले जाणार आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्याचे नंबर वाढणार आहेत.
सप्टेंबरची सुरुवात अत्यंत मंदावली होती. ग्राहक सणांच्या ऑफर्स, जीएसटी दरांतील बदल आणि पितृपक्षाच्या काळात मोठ्या खरेदी टाळण्याच्या परंपरेमुळे विक्रीत सुस्ती आली. मात्र, २२ सप्टेंबरनंतर नवरात्र सुरू झाल्यावर बाजारात रंग चढला. जीएसटी दर कमी झाल्याचा फायदा दिसू लागला, ज्यामुळे शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी, बुकिंग आणि चौकशी वाढली. विशेषतः पॅसेंजर कार आणि दुचाकी वाहन विभागात ही तेजी जाणवली आहे. परंतू, ती ऑक्टोबरमध्ये जास्त दिसण्याची शक्यता आहे.