क्रेटाच्या किमतीत टेस्ला मिळणार; कंपनीचा प्लॅन तयार, किंमत 13 लाखांपर्यंत कमी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:24 PM2024-01-05T12:24:48+5:302024-01-05T12:28:24+5:30

कंपनीने म्हटले आहे की, चीनमध्ये आधीच यावर काम सुरु आहे.

tesla elon musk planning to introduce small batteries for indian market to lower the price of car by 13 lakhs | क्रेटाच्या किमतीत टेस्ला मिळणार; कंपनीचा प्लॅन तयार, किंमत 13 लाखांपर्यंत कमी होणार!

क्रेटाच्या किमतीत टेस्ला मिळणार; कंपनीचा प्लॅन तयार, किंमत 13 लाखांपर्यंत कमी होणार!

नवी दिल्ली : टेस्ला कंपनी भारतात सर्वात स्वस्त कार लाँच करण्यासाठी छोट्या बॅटरी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहे. इलेक्ट्रिक कारमधील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे बॅटरी आणि त्याची किंमत कमी केल्यास कार खूपच स्वस्त बनवता येते. मिंटच्या एका बातमीनुसार, टेस्लाने भारत सरकारसोबत छोट्या बॅटरी बनवण्याचा आपला इरादा शेअर केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, चीनमध्ये आधीच यावर काम सुरु आहे.

दरम्यान, लहान बॅटरीची एक समस्या अशी आहे की, फार लांबच्या अंतरापर्यंत प्रवास करता येणार नाही. त्यासाठी देशभरात बॅटरी चार्जिंग स्टेशनचे नेटवर्क लागणार आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतात बॅटरी चार्जिंग स्टेशनची संख्या जवळपास 9300 आहे. जर आपण इतरांच्या तुलनेत पाहिले तर अमेरिकेत सुमारे 1,38,000 वाहन चार्जिंग स्टेशन आहेत.

लहान बॅटरीमध्ये एनर्जी स्टोरेज कमी असेल आणि त्यामुळे कार एका चार्जवर कमी अंतर प्रवास करू शकेल. उदाहरणार्थ, टेस्लाच्या मॉडेल 3 च्या बेस व्हेरिएंटमध्ये 57.5 किलोवॅट-तास बॅटरी आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 435 किलोमीटरपर्यंत धावू शकते. दरम्यान, टेस्लाची ही सर्वात स्वस्त कार आहे. या कारची किंमत 40,000 डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 33 लाख रुपये होईल.

बॅटरी चार्जिंग स्टेशन्सची संख्या वाढवून बॅटरीची साइज कमी केली तर कारची किंमत बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकते. मिंटच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जर बॅटरीचा आकार कमी केला तर टेस्ला भारतात 20 लाख रुपयांपर्यंतची कार लाँच करू शकते. या किमतीत क्रेटा आणि XUV700 सारख्या कार भारतात विकल्या जातात.

लहान क्षमतेची बॅटरी दैनंदिन वापरासाठी योग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. साधारण कोणतीही व्यक्ती दररोज 400-500 किलोमीटर कार चालवत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. भारतात फास्ट चार्जिंग स्टेशन आहेत, पण त्यांची संख्या खूपच कमी आहे. फास्ट चार्जिंग स्टेशनवर, देशातील सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन एक तासात 20 ते 80 टक्के चार्ज होते. यावर ही कार 200 किलोमीटरचा प्रवास करू शकते. तसेच, टेस्लाचा दावा आहे की, त्यांचे फास्ट चार्जिंग 15 मिनिटांत 230 किलोमीटरची रेंज देते.

भारतात टेस्ला कधी येणार?
टेस्ला कंपनीच्या कार भारतात येण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यानंतर टेस्लाच्या भारतात प्रवेशाची चर्चा अधिकच जोर धरू लागली. या संदर्भात भारत सरकार आणि टेस्ला यांच्यात उच्च अधिकृत स्तरावरही चर्चा सुरू आहे. एका रिपोर्टनुसार, टेस्ला भारतात 2 बिलियन डॉलर्स किंवा 16000 कोटी रुपये अधिक गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. मात्र, कंपनीची अट आहे की, पहिल्या 2 वर्षांसाठी आयात केलेल्या कारवर शुल्कात सूट देण्यात यावी आणि केवळ 15 टक्के शुल्क वसूल केले जावे. दरम्यान, सध्या आयात केलेल्या इलेक्ट्रिक कारवर 70-100 टक्के शुल्क आहे.

Web Title: tesla elon musk planning to introduce small batteries for indian market to lower the price of car by 13 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.