ना पेट्रोल, ना CNG; सुझुकीने आणली चक्क बायोगॅसवर चालणारी कार, कशी आहे जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:50 IST2025-10-29T13:48:05+5:302025-10-29T13:50:27+5:30
Suzuki Victoris CBG: सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने बायोगॅसवर चालणारी व्हिक्टोरिस सीबीजी सादर केली आहे.

ना पेट्रोल, ना CNG; सुझुकीने आणली चक्क बायोगॅसवर चालणारी कार, कशी आहे जाणून घ्या...
Suzuki Victoris CBG: काळाबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्र वेगाने स्वतःला अपडेट करत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, तसेच प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, ऑटोमेकर्स सतत नव-नवीन इंधन पर्यायांवर लक्ष केंद्रित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुझुकीने कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) वर चालणारी एक नवीन एसयूव्ही सादर केली आहे.
मारुती सुझुकीची पॅरेंट कंपनी ‘Suzuki Motor Corporation’ ने जपान मोबिलिटी शो 2025 मध्ये ‘Suzuki Victoris CBG’ सादर केली. ही गाडी पेट्रोल, डिझेल किंवा CNG नाही, तर चक्क बायोगॅसवर चालू शकते. अशाप्रकारची गाडी भारतासारख्या देशासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. बायोगॅस हा मल-मुत्र आणि इतर सेंद्रीय कचऱ्यापासून तयार केला जातो. त्यामुळे ही गाडी आपल्याकडे एक उत्तम आणि स्वस्त पर्याय ठरेल.
जपान मोबिलिटी शो 2025 मध्ये ‘Victoris CBG’चे अनावरण
जपान मोबिलिटी शो 2025 मध्ये सुझुकीने आपल्या कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्पाचे अनावरण केले. या प्रकल्पाचा उद्देश फक्त पर्यावरणसंवर्धन नव्हे, तर भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देणे हा आहे. कंपनी डेअरी वेस्ट (दुध उत्पादनातील सेंद्रिय अपशिष्ट) वापरुन बायोगॅस निर्मितीवर काम करत आहे, ज्याचा उपयोग नंतर वाहनांच्या इंधनासाठी केला जाणार आहे.
सुझुकीचे मिशन
या प्रकल्पातून साकारलेले पहिले उत्पादन म्हणजे ‘Suzuki Victoris CBG’ SUV. याच्या CBG व्हेरिएंटमध्ये टँक गाडीच्या फ्लोअरखाली बसवला आहे, ज्यामुळे बूट स्पेस मिळतो. Victoris SUV मध्ये मल्टी-पॉवरट्रेन ऑप्शन दिले आहेत, जे पेट्रोल माइल्ड हायब्रिड, स्ट्रॉन्ग हायब्रिड आणि फॅक्टरी-फिटेड CNG / CBG व्हर्जनमध्ये मिळतील.
CBG म्हणजे काय?
CBG म्हणजे कंप्रेस्ड बायोगॅस. हा गॅस कृषी अवशेष, सांडपाणी आणि शेण यांसारख्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तयार केला जातो. या प्रक्रियेतून मिळालेल्या बायोगॅसमधून कार्बन डायऑक्साइड कमी करून आणि मीथेनचे प्रमाण वाढवून शुद्ध CBG तयार केले जाते. हा गॅस नंतर इंटरनल कम्बशन इंजिन (ICE) मध्ये वापरला जातो, ज्यामुळे कार कमी खर्चात चालवता येते.