Delhi End Of Life Policy: वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत १ जुलैपासून वाहनांसाठी End of Life हे नवीन धोरण लागू करण्यात आले आहे. याअंतर्गत १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल गाड्यामध्ये आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल गाड्यांमध्ये पेट्रोल-डिझेल न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसं करताना कोणी सापडलं तर त्याची गाडी जप्त केली जाणार आहे. आता हे धोरण लागू झाल्यानंतर अशा गाड्या असणारे दिल्लीकर आपलं दुःख व्यक्त करत आहेत. अशातच एका कार मालकाला ८५ लाख रुपयांना खरेदी केलेली कार नवीन धोरणामुळे फक्त अडीच लाख रुपयांना विकावी लागली.
वरुण विज यांनी २०१५ मध्ये त्याने त्यांची आवडती मर्सिडीज-बेंझ एमएल३५० ही गाडी ८५ लाख रुपयांना खरेदी केली होती. "जेव्हा मी ही आलिशान कार खरेदी केली तेव्हा कुटुंब खूप आनंदी होते. गेल्या काही वर्षांत, माझी कारशी खूप भावनिक नातं निर्माण झालं होतं," असं विज यांनी सांगिले. गाडी १० वर्षांत १.३५ लाख किलोमीटर धावली होती. तरीही ती स्थितीत होती. गाडीवर विशेष काम करण्याची गरज नव्हती. फक्त टायर बदलणे आणि वेळेवर सर्व्हिसिंग करणे एवढेच त्यात काम होते, असा दावा विज यांनी केला. पण नंतर दिल्ली सरकारचे 'एंड ऑफ लाईफ' धोरण आले आणि विज यांना ही गाडी विकाली लागली.
"सरकारी नियमानुसार कालबाह्य झालेली गाडी विकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. अडीच लाख रुपयांनाही गाडी खरेदी करण्यास कोणीही तयार नव्हते. मर्यादित पर्यायांमुळे मला ती विकावी लागली. मला आशा होती की मी तिचे नूतनीकरण करून घेईल. पण तसे झाले नाही," असेही वरुण विज म्हणाले.
नव्या नियमांमुळे विज यांनी आता ६२ लाख रुपयांची नवीन ईलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे जेणेकरून भविष्यात मला अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. जर कोणतेही नवीन सरकारी धोरण लागू केले नाही तर मी किमान २० वर्षे नवीन कार चालवू शकतो असं विज म्हणाले.
दरम्यान, १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना लावलेला हा नियम सध्या फक्त दिल्लीतच लागू आहे. जर वरुण विज यांनी ही कार दिल्लीबाहेरील एखाद्याला विकली असती तर त्यांना चांगली किंमत मिळाली असती.