Petrol vs CNG! कोणती कार योग्य? खर्च, मायलेज अन् परफॉर्मन्स; जाणून घ्या गणित...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 15:28 IST2026-02-08T15:26:36+5:302026-02-08T15:28:31+5:30
Petrol vs CNG Cars: चुकीचा निर्णय महागात पडू शकतो

Petrol vs CNG! कोणती कार योग्य? खर्च, मायलेज अन् परफॉर्मन्स; जाणून घ्या गणित...
Petrol vs CNG Cars: नवीन कार खरेदी करताना अनेक ग्राहकांसमोर एकच मोठा प्रश्न उभा असतो, पेट्रोलकार घ्यावी की, CNG? CNG कार कमी खर्चात जास्त मायलेज देते, तर पेट्रोल कार उत्तम पिक-अप आणि स्मूद ड्रायव्हिंगचा अनुभव देते. त्यामुळे कार खरेदीपूर्वी दोन्ही पर्यायांची सखोल तुलना करणे गरजेचे आहे.
खरेदीपूर्वीचा मोठा निर्णय
नवीन कार खरेदी करताना इंधनाचा प्रकार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. विशेषतः बजेट मर्यादित असेल, तर हा निर्णय अधिक कठीण होतो. CNG आणि पेट्रोल, दोन्हींचे काही फायदे आहेत, तर काही तोटेही आहेत. त्यामुळे वापर, ड्रायव्हिंग पॅटर्न आणि खर्चाचा विचार करूनच निर्णय घेणे योग्य ठरते.
CNG आणि पेट्रोल कारचे गणित...
इंधनाच्या किमतींच्या बाबतीत CNG हा पेट्रोलपेक्षा स्वस्त पर्याय मानला जातो. मात्र हा फरक प्रत्येक शहरात समान नसतो. दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये CNGची किंमत साधारण ₹८० प्रति किलोपेक्षा कमी आहे, त्यामुळे रोज मोठे अंतर कापणाऱ्यांना मोठा फायदा होतो. तर लहान शहरांमध्ये CNGचा दर ₹८५ ते ₹१०० प्रति किलो इतका असू शकतो. तरीही, दीर्घकालीन वापरात CNG पेट्रोलपेक्षा किफायतशीर ठरते आणि खिशाला कमी फटका बसतो.
मायलेजमध्ये कोण आघाडीवर?
मायलेजच्या बाबतीत CNG कार स्पष्टपणे पुढे आहेत. पेट्रोल कार साधारण १५ ते २२ किमी प्रति लिटर मायलेज देतात, तर CNG कार सुमारे २२ ते ३५ किमी प्रति किलो मायलेज देतात. याच कारणामुळे सध्या अनेक ग्राहक CNG व्हेरिएंटकडे वळताना दिसत आहेत. मारुती, टाटा आणि हुंडईसारख्या कंपन्यांच्या CNG कार आणि SUV बाजारात झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. अलीकडच्या काळात CNG SUVच्या विक्रीतही लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे.
परफॉर्मन्समध्ये फरक
मात्र जास्त मायलेजच्या बदल्यात CNG कारमध्ये परफॉर्मन्सवर थोडा तडजोड करावी लागते. पेट्रोल कारच्या तुलनेत CNG कारमध्ये पॉवर आणि टॉर्क कमी असतो. त्यामुळे वेग वाढवताना किंवा ओव्हरटेकिंग करताना हा फरक जाणवू शकतो. पेट्रोल कार अधिक स्मूद ड्रायव्हिंग अनुभव देतात आणि हायवे ड्रायव्हसाठी त्या अधिक योग्य मानल्या जातात.
कोणती कार घ्यावी?
जर तुम्ही दररोज अनेक किमीचा प्रवास करणार असाल आणि इंधनखर्च कमी ठेवायचा असेल, तर CNG कार हा शहाणपणाचा पर्याय ठरू शकतो. मात्र जर तुम्हाला दमदार परफॉर्मन्स, चांगला पिक-अप आणि लांब हायवे ड्राइव्ह आवडत असेल, तर पेट्रोल कार तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल.