ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:11 IST2025-05-21T11:11:01+5:302025-05-21T11:11:12+5:30
Ola's Roadster delivery Date: ओलाच्या प्रिमिअम स्कूटरची किंमत आता गगनाला भिडली आहे. नव्या जनरेशनची स्कूटर ओला एस १ प्रो प्लस ही १.८० लाख ते २.३० लाखांपर्यंत जात आहे.

ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...
बरेच महिने लोटले, ओलाची मोटरसायकल काही केल्या रस्त्यावर येत नव्हती. परंतू, ओलाने एका महिन्याच्या विक्रीच्या आकड्यात ही मोटरसायकल घुसडली होती. यावरून सेबीसह केंद्रीय संस्थांनी ओलाला नोटीसांवर नोटीसा पाठवून उत्तर द्यायला भाग पाडलेले होते. आता कुठे ओलाने या ईलेक्ट्रीक मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून होणार हे जाहीर केले आहे.
ओलाच्या प्रिमिअम स्कूटरची किंमत आता गगनाला भिडली आहे. नव्या जनरेशनची स्कूटर ओला एस १ प्रो प्लस ही १.८० लाख ते २.३० लाखांपर्यंत जात आहे. पेट्रोल वरील पैसे वाचविण्यासाठी लोक इलेक्ट्रीक स्कूटरकडे वळू लागले होते, परंतू या किंमती पाहता या स्कूटरला कोणी भाव देईल का, असाही प्रश्न पडू लागला आहे. अशातच ओलाने इलेक्ट्रीक मोटरसायकलचा पर्याय ठेवला आहे. जो या तुलनेत खूपच स्वस्त आहे.
अनेकांनी स्कूटर नको मोटरसायकल हवी म्हणून इलेक्ट्रीक वाहनांकडे पाठ फिरविली होती. ओलाने हेच हेरले आणि मोटरसायकल आणली आहे. तीवपैकी एक मॉडेल रोडस्टर एक्स २३ मे पासून डिलिव्हर केली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच करण्यात आलेली ही मोटरसायकल आता कुठे मे संपत आला तेव्हा लोकांना मिळणार आहे. यापूर्वी तारीख पे तारीख दिली जात होती.
रोडस्टर एक्सची सुरुवात 74,999 रुपयांपासून होत आहे. रोडस्टर एक्स+ 1,04,999 रुपयांना मिळते. या किंमती एक्स शोरुम आहेत. बेस व्हेरिअंटमध्ये 2.5 kWh ची बॅटरी आहे, जी १४० किमी पर्यंतची रेंज देते. 3.5 kWh ची बॅटरीवाली मोटरसायकल 196 किलोमीटरची रेंज देते. 4.5 kWh ची मोटरसायकल 252 किमीची रेंज देते. रोडस्टर एक्समध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, अॅडव्हान्स्ड रिजन, क्रूझ कंट्रोल, टीपीएमएस आणि ओटीए अपडेट्स सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
आता ओला एस १ प्रोमध्ये एवढ्या समस्या आलेल्या की ओलाची पुरती नाचक्की झाली होती. अगदी काही महिन्यांपर्यंत ओलाच्या सर्व्हिस सेंटरवर स्कूटर धुळ खात पडलेल्या होत्या. सध्या वादग्रस्त ठरलेला कॉमेडियन कुणाल कामराने आवाज उठविताच ओलाच्या मालकाची त्याच्यासोबत जुंपलीही होती. या सर्व अनुभवांवरून ओलाची रोडस्टर मोटरसायकल सामान्यांसाठी किती विश्वासार्ह ठरते, यावरून या मोटरसायकलचे भविष्य ठरणार आहे. सध्यातरी बाजारात ईलेक्ट्रीक मोटरसायकलचा तगडा पर्याय उपलब्ध नाही, यामुळे ही बाजारपेठ ओलाला मोठे यश देखील मिळवून देणारी ठरू शकते.