ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:48 IST2025-11-17T17:40:29+5:302025-11-17T17:48:59+5:30
Ola scooter Service problem: ओला S1 प्रो स्कूटर २ महिने बंद. ओला केअर पॅक असूनही सर्व्हिस मिळाली नाही. ग्राहकाला ₹८५०० खर्च आला; महाराष्ट्र सरकारने विक्रीवर बंदी घालावी, मागणी.

ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
मुंबई: इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारात दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या 'ओला इलेक्ट्रिक' (Ola Electric) च्या खराब सर्व्हिस नेटवर्कमुळे ग्राहक त्रस्त झाले असून, मुंबईतील एका ग्राहकाला तब्बल ८,५०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. दोन महिन्यांपूर्वी बंद पडलेल्या आपल्या ओला एस१ प्रो स्कूटरला कंपनीकडून कोणतीही मदत न मिळाल्याने, अखेरीस त्यांनी खासगी मेकॅनिककडून गाडी दुरुस्त करून घेतली.
ओलाचे राज्यभरातील बहुतांश 'एक्सपिरिअन्स सेंटर्स' सध्या ट्रेड सर्टिफिकीट नसल्याने बंद आहेत. सर्व्हिससाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही.
₹४००० चे केअर पॅकही निरुपयोगी
पीडित ग्राहकाने ₹४,००० किमतीचे 'ओला केअर पॅक' आणि 'आरएसए' (रोडसाईड असिस्टन्स) साठी पैसे भरले होते. या पॅकमध्ये घरी येऊन सर्व्हिस देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. मात्र, स्कूटर बंद पडल्यानंतर वारंवार फोन, मेल करूनही कंपनीकडून केवळ आश्वासने मिळाली, पण कोणीही स्कूटर घेण्यासाठी आले नाही. दोन महिने वाट पाहून, दीड लाख रुपयांची ही स्कूटर कवडीमोल झाली.
शेवटी, कंटाळून या ग्राहकाने बाहेरच्या मेकॅनिकला बोलावून गाडी दुरुस्त केली, ज्यासाठी त्यांना ₹८,५०० चे बिल भरावे लागले.
या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने, 'आम्ही फसलो, दुसरे फसू नयेत,' यासाठी गोवा सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. कंपनीकडून अद्यापही सर्व्हिससाठी कोणताही कॉल आलेला नाही.