ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 22:17 IST2025-11-18T22:16:57+5:302025-11-18T22:17:22+5:30
Honda Private Jet: अभिनव डिझाइन आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे हे जेट अनेक वर्षांपासून आपल्या श्रेणीतील सर्वाधिक विक्री होणारे विमान ठरले आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
ऑटोमोबाईल क्षेत्रात दबदबा निर्माण केल्यानंतर जपानच्या होंडा कंपनीने विमान वाहतूक उद्योगातही एक मोठी क्रांती घडवली आहे. होंडाने बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त आणि अत्यंत कार्यक्षम 'व्हेरी लाईट जेट' श्रेणीतील विमान तयार केले आहे. ज्याचे नाव होंडाजेट आहे. आपल्या अभिनव डिझाइन आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे हे जेट अनेक वर्षांपासून आपल्या श्रेणीतील सर्वाधिक विक्री होणारे विमान ठरले आहे.
होंडाजेटची किंमत इतर प्रायव्हेट जेट्सपेक्षा कमी असली तरी, त्याची कार्यक्षमता आणि वेग उच्च दर्जाचा आहे. नव्या होंडाजेटची किंमत मॉडेलनुसार सुमारे $५० लाख (सुमारे ४१ कोटी रुपये) ते $७० लाख (सुमारे ५८ कोटी रुपये) दरम्यान आहे. सेकंड हँड विमाने यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत.
युनिक इंजिन डिझाइन
या जेटचे सर्वात मोठे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे इंजिन विंग्सच्या खाली न बसवता, विंगच्या वरच्या बाजूला बसवलेले आहे. या डिझाइनमुळे केबिनमध्ये आवाज कमी होतो आणि इंधनाची कार्यक्षमता वाढते.
आरामदायक केबिन
हे जेट सामान्यतः ४ ते ५ प्रवासी आणि एका किंवा दोन क्रू सदस्यांसाठी उपयुक्त आहे. ४०,००० फुटांहून अधिक उंचीवर उडण्याची क्षमता यात आहे. हे जेट त्याच्या श्रेणीतील सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे. ताशी सुमारे ७८२ किमी वेगाने हे उड्डाण करू शकते आणि एका वेळेस सुमारे २,८०० किमी हून अधिक अंतर कापण्याची याची क्षमता आहे.
होंडा जेटची ही नवीन श्रेणी व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, ज्यामुळे विमान वाहतूक आता अधिकाधिक सामान्य लोकांसाठी (खासकरून छोटे उद्योजक आणि चार्टर कंपन्यांसाठी) परवडणारी बनत आहे.