नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढताना दिसून येत आहे. मार्केटमध्ये गेल्या काही काळात अनेक इलेक्ट्रिक कार लाँच झाल्या आहेत. आता एमजी मोटर देखील आपली नवीन इलेक्ट्रिक कार लवकरच लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतीय मार्केटमधील ही कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे, याआधी कंपनीने MG eZS लाँच केली आहे. या कारला मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एमजीची ही नवीन इलेक्ट्रिक कार आकाराने लहान आणि किफायतशीर असणार आहे, असे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ही कार एका चार्जमध्ये 200 किमी पर्यंत प्रवास करू शकेल. ताज्या अपडेटनुसार कंपनी ही कार 5 जानेवारीला लाँच होण्याची शक्यता आहे.
रिपोट्सच्या म्हणण्यानुसार, ही इलेक्ट्रिक कार इंडोनेशियामध्ये विकल्या जाणार्या Wuling Air EV वर आधारित असणार आहे. भारतात या कारला E230 हे कोड नाव देण्यात आले आहे, सध्या तरी भारतात Air EV असे नाव देण्याची शक्यता कमी आहे. याठिकाणी कारला नवीन नाव दिले जाऊ शकते.
एमजी मोटरद्वारे लवकरच आणल्या जाणार्या या इलेक्ट्रिक कारची डायमेंशन Wuling Air EV सारखी असू शकतात. कारची लांबी 2,974 मिमी, रुंदी 1,505 मिमी आणि उंची 1,631 मिमी असणार आहे. या इलेक्ट्रिक कारचा व्हील बेस 2,010 मिमी असेल. म्हणजेच ही इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV पेक्षा लहान असू शकते.
दोन बॅटरी पर्यायांसह येईल कार कंपनी ही इलेक्ट्रिक कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पर्यायांसह देऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, एका व्हेरिएंटमध्ये 17.3 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला जाऊ शकतो आणि दुसर्या व्हेरिएंटमध्ये 26.7 kWh क्षमतेचा वापर केला जाऊ शकतो. कारचा छोटा बॅटरी पॅक एका चार्जमध्ये 200 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो आणि मोठा पॅक 300 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो.
बॅटरी व्यवस्थापन प्रणालीवर काम केले जाऊ शकतेएमजी मोटर इंडिया वाहनात काही आवश्यक बदलही करणार आहे. हवामान नियंत्रण आणि बॅटरी व्यवस्थापन प्रणालीवर काम केले जाऊ शकते, जेणेकरुन वाहन अत्यंत उष्णता आणि तीव्र हवामानाचा सामना करू शकेल. भारतीय हवामानानुसार, कारची चांगली बॅटरी व्यवस्थापन प्रणाली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण गेल्या उन्हाळ्यात देशाच्या विविध भागांत इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.
किती असू शकते किंमत?एमजी मोटरच्या मते, ही कार 2023 च्या सुरुवातीच्या महिन्यात लाँच केली जाईल. दरम्यान, कार निर्माता कंपनी ऑटो एक्सपो 2023 मध्ये लाँच करेल अशी शक्यता आहे. तसेच, या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.