इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 09:44 IST2026-01-13T09:42:54+5:302026-01-13T09:44:25+5:30
MAruti Suzuki's service Center on Petrol pump: मारुती सुझुकी आणि इंडियन ऑईल (IOCL) मध्ये करार! आता देशभरातील पेट्रोल पंपांवर मारुती कारची सर्व्हिसिंग आणि देखभाल सुविधा उपलब्ध होणार. सविस्तर माहिती वाचा.

इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
नवी दिल्ली: भारतीय वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकी आणि पेट्रोलियम क्षेत्रातील महारत्न कंपनी इंडियन ऑईल यांनी ग्राहकांच्या सोयीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेल्या नवीन करारानुसार, आता देशभरातील निवडक इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवरमारुती सुझुकीचे अधिकृत सर्व्हिस सेंटर्स सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे गाडीत इंधन भरण्यासोबतच तिची देखभाल करणे अधिक सोपे होणार आहे.
मारुती सुझुकीचे सध्या भारतात ५,७८० हून अधिक सर्व्हिस सेंटर्स आहेत. मात्र, इंडियन ऑईलचे देशभरात ४१,००० पेक्षा जास्त पेट्रोल पंप आहेत. या अफाट जाळ्याचा वापर करून मारुती सुझुकीला आपले सर्व्हिस नेटवर्क दुर्गम भागापर्यंत पोहोचवायचे आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना नियमित देखभाल आणि किरकोळ दुरुस्तीसाठी शहरातल्या मुख्य वर्कशॉपला जाण्याची गरज उरणार नाही.
ग्राहकांना मिळणारे फायदे:
वेळेची बचत: इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेल्यावर तिथेच गाडीची छोटी-मोठी कामे करून घेता येतील.
नियमित मेंटेनन्स: ऑईल चेंज, फिल्टर्स बदलणे आणि जनरल हेल्थ चेकअप यांसारख्या सेवा पंपावरच उपलब्ध होतील.
ग्रामीण भागात पोहोच: दुर्गम किंवा महामार्गावरील ग्राहकांना मारुतीच्या अधिकृत सर्व्हिसिंगसाठी लांब जावे लागणार नाही.
विश्वासार्हता: अधिकृत पार्ट आणि प्रशिक्षित मेकॅनिक्समुळे कामाची गुणवत्ता टिकून राहील.
मारुती सुझुकीचे कार्यकारी अधिकारी राम सुरेश अकेला यांनी सांगितले की, "ग्राहकांचा कार मालकीचा प्रवास अधिक सुलभ करणे हे आमचे ध्येय आहे. इंडियन ऑईलच्या मोठ्या नेटवर्कमुळे आम्ही ग्राहकांच्या अगदी जवळ पोहोचू शकू." तर, इंडियन ऑईलचे मार्केटिंग संचालक सौमित्र श्रीवास्तव यांच्या मते, ही भागीदारी 'वन-स्टॉप सोल्यूशन' म्हणून ग्राहकांसाठी गेमचेंजर ठरेल.