भारतात लाँच झाली होती पहिली इलेक्ट्रिक कार! 'टेस्ला'च्याही आधीची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहितीय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:27 IST2026-02-21T13:27:47+5:302026-02-21T13:27:59+5:30
भारताची पहिली इलेक्ट्रिक कार 'लवबर्ड' १९९३ मध्ये लाँच झाली होती. ६० किमी रेंज आणि ८ तास चार्जिंग वेळ असलेल्या या कारबद्दलच्या रंजक गोष्टी वाचा.

भारतात लाँच झाली होती पहिली इलेक्ट्रिक कार! 'टेस्ला'च्याही आधीची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहितीय का?
नवी दिल्ली: आज जगभरात इलेक्ट्रिक गाड्यांची मोठी क्रेझ आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रिक कारचा विचार करतो, तेव्हा डोळ्यासमोर पहिले नाव येते ते म्हणजे एलन मस्क यांची 'टेस्ला'. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, ज्या काळात मस्क केवळ २१ वर्षांचे होते आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते, त्याच वेळी भारताने आपली पहिली इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज केली होती.
साल १९९३ मध्ये 'एडी करंट कंट्रोल्स (इंडिया) लिमिटेड' या कंपनीने जपानच्या 'यास्कावा इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन'च्या तांत्रिक सहकार्याने 'लवबर्ड' नावाची कार लाँच केली होती. या कारचे पहिले प्रदर्शन नवी दिल्लीतील ऑटो एक्सपोमध्ये करण्यात आले होते.
कशी होती ही 'लवबर्ड'?
ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर ६० किलोमीटरपर्यंत चालू शकत असे. कार पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ८ तासांचा वेळ लागत असे. त्या काळात लिथियम-आयन बॅटरी उपलब्ध नसल्यामुळे यात लेड-ऍसिड बॅटरी आणि डीसी इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली होती. ही एक कॉम्पॅक्ट टू-सीटर कार होती, जी खास करून शहरांमधील गर्दी लक्षात घेऊन बनवण्यात आली होती.
इतकी प्रगत असूनही का झाली फ्लॉप?
लवबर्ड ही कार आपल्या काळाच्या खूप पुढे होती. मात्र, व्यावसायिकदृष्ट्या ती यशस्वी होऊ शकली नाही. केवळ १०० युनिट्सची विक्री झाल्यावर याचे उत्पादन बंद करावे लागले. याची मुख्य कारणे म्हणजे चार्जिंग पायाभूत सुविधांचा अभाव हे होते. त्या काळातील वीज कपातीची मोठी समस्या होती. तसेच कारची जास्त किंमत देखील होती. जरी 'लवबर्ड' यशस्वी झाली नसली, तरी भारताच्या इलेक्ट्रिक वाहन प्रवासातील तो एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो.