सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:19 IST2025-08-28T14:17:02+5:302025-08-28T14:19:46+5:30
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटप्रमाणेच महागड्या आणि आलिशान गाड्यांचाही शौक आहे.

सचिन तेंडुलकरची मॉडिफाय लॅम्बोर्गिनी उरुस एस कार पाहून मुंबईकर चकीत!
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला क्रिकेटप्रमाणेच महागड्या आणि आलिशान गाड्यांचाही शौक आहे. नुकताच तो मुंबईच्या रस्त्यांवर ४.२ कोटी रुपयांची मॉडिफाय केलेली लॅम्बोर्गिनी उरुस एस चालवताना दिसला. या स्पोर्ट्स कारमध्ये त्याने केलेले मोठे बदल पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
२०२३ मध्ये सचिनने ही निळ्या रंगाची लॅम्बोर्गिनी उरुस एस खरेदी केली, पण त्यानंतर त्याने त्यात अनेक बदल केले आहेत. या गाडीत स्टँडर्ड सिल्व्हर अलॉय व्हील्सऐवजी आता २२-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स लावण्यात आले आहेत. शिवाय, कारला अधिक स्पोर्टी लूक देण्यासाठी त्यात कार्बन फायबर विंग, फ्रंट स्प्लिटर, साइड स्कर्ट आणि रिअर डिफ्यूसर बसवण्यात आले आहेत. हे पार्ट्स मॅन्सोरी किंवा १०१६ या नामांकित कंपन्यांकडून घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लॅम्बोर्गिनी उरुस एस मध्ये ४.०-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे ६६६ पीएस पॉवर आणि ८५० एनएम टॉर्क जनरेट करते. यात ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टिम आहे. या दमदार इंजिनमुळे ही एसयूव्ही फक्त ३.५ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते. ही कार कोणत्याही सुपरकारपेक्षा कमी नाही.
सचिन तेंडुलकरने आपली गाडी मॉडिफाय करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने आपली पोर्श ९११ टर्बो एस टेकआर्ट बॉडीकिट आणि सॅटिन ब्लॅक फिनिश देऊन मॉडिफाय केली होती. त्याची बीएमडब्ल्यू आय८ सुद्धा अनोख्या बॉडीकिटसाठी चर्चेत होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने आपल्या कलेक्शनमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांची रेंज रोव्हर एसव्ही ऑटोबायोग्राफी देखील समाविष्ट केली. ही गाडी खास सेडोना रेड शेड आणि कस्टम रेड अल्कंटारा इंटीरियरसह येते.