KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 20:55 IST2025-11-19T20:54:48+5:302025-11-19T20:55:15+5:30
KTM ने 125, 250, 390, 990 Duke साठी ग्लोबल रिकॉल जारी केला. इंधन टाकीचे सील सदोष असल्याने इंधन गळतीचा धोका. ग्राहक त्वरित डिलरशीपशी संपर्क साधा.

KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
दुचाकी उत्पादक कंपनी KTM ने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतासह जगभरातील Duke मालिकेतील चार लोकप्रिय मॉडेल्ससाठी तातडीचा 'ग्लोबल रिकॉल' जाहीर केला आहे. या रिकॉलमध्ये 125 Duke, 250 Duke, 390 Duke आणि 990 Duke या मॉडेल्सचा समावेश आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेल्समधील इंधन टाकीच्या झाकणाचे सील सदोष असल्याचे आढळले आहे. सील सदोष असल्यामुळे टाकी पूर्ण भरलेली असताना इंधन गळती होण्याची शक्यता आहे. दुचाकी चालवत असताना किंवा उन्हात पार्क केलेली असताना ही गळती झाल्यास, आग लागण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कंपनीने ग्राहकांची सुरक्षितता विचारात घेतली आहे.
ग्राहकांनी काय करावे?
KTM ने जाहीर केले आहे की, रिकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या वाहनांची तपासणी आणि दुरुस्ती सर्व्हिस सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. या मॉडेल्सच्या भारतीय ग्राहकांनी विलंब न करता आपल्या जवळच्या KTM डीलरशिपशी संपर्क साधावा. डीलरशिपमध्ये, कर्मचाऱ्यांकडून इंधन टाकीच्या झाकणाची तपासणी केली जाईल आणि आवश्यक असल्यास सदोष सील तातडीने बदलून दिले जाणार आहे.