काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 06:19 IST2025-10-20T06:11:46+5:302025-10-20T06:19:39+5:30
या खरेदीत बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिजसारख्या लक्झरी ब्रँडच्या कारचा समावेश आहे.

काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
अहमदाबाद : गुजरातमध्ये जैन समुदायाने तब्बल १८६ महागड्या लक्झरी कार एकत्रित खरेदी करून आपली क्रयशक्ती सिद्ध करीत सुमारे २१ कोटी रुपयांचे डिस्काऊंट मिळविले आहे. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (जेआयटीओ) पुढाकारातून झालेल्या या खरेदीत बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिजसारख्या लक्झरी ब्रँडच्या कारचा समावेश आहे.
जेआयटीओ ही एक सेवाभावी संघटना असून त्यांचे देशभर ६५ हजार सदस्य आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी शनिवारी या अनोख्या खरेदीची माहिती दिली. ते म्हणाले, ‘या १८६ लक्झरी कारमध्ये प्रत्येक कारची किंमत ६० लाखांपासून १.३ कोटी रुपयांपर्यंत आहे. यावर्षी जानेवारी ते जून या काळात संपूर्ण भारतात या कार संबंधित मालकांकडे सोपविण्यात आल्या. जेआयटीओच्या या राष्ट्रव्यापी अभियानाच्या माध्यमातून सदस्यांची २१ कोटी रुपयांची बचत झाली आहे.’ संघटना या व्यवहारात केवळ सुविधा देणारी मध्यस्थ म्हणून राहिली असे शाह यांनी सांगितले.
क्रयशक्तीचा लाभ
या अभियानाचे सूत्रधार नितीन जैन यांनी सांगितले, जेआयटीओच्या सदस्यांनी या समुदायातील क्रयशक्तीचा लाभ घेत कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून मोठी सूट मिळविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी आम्ही सदस्यांच्या या खरेदीवर चांगली सूट मिळवण्याच्या दृष्टीने थेट ब्रँडशी संपर्क साधण्याचे ठरवले. कारर्निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही हे फायद्याचे वाटल्याने त्यांनी डिस्काऊंटची ऑफर दिली, असे जैन म्हणाले.
८ ते १७ लाखांची बचत
या १८६ कार खरेदीत मिळालेले डिस्काऊंट पाहता एकूण २१ कोटी रुपयांची बचत झाली. म्हणजचे प्रत्येक सदस्याने सुमारे ८ ते १७ लाख रुपये वाचवले. जैन यांच्यानुसार, या लाभामुळे उत्साहित ‘जेआयटीओ’ने आता ‘उत्सव’ हा नवा उपक्रम सुरू केला. यात दागिने, नामांकित ब्रँडच्या वस्तू खरेदीसाठीही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे.