ब्रिटेनमध्ये वाजणार Hero चा डंका; कंपनीने केली मोठी घोषणा, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 15:48 IST2025-10-24T15:47:57+5:302025-10-24T15:48:22+5:30
हीरो मोटोकॉर्पची आता 51 देशात उपस्थिती.

ब्रिटेनमध्ये वाजणार Hero चा डंका; कंपनीने केली मोठी घोषणा, जाणून घ्या...
Hero Motocorp: भारताची सर्वात मोठी टू-व्हिलर उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प आता अधिकृतपणे युनायटेड किंगडमच्या (UK) बाजारात दाखल झाली आहे. हीरोसाठी हा 51वा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रवेश ठरत असून, इटली आणि स्पेननंतर युकेमुळे कंपनीची युरोपमधील उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.
ही एन्ट्री हीरोने ब्रिटनच्या प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी MotoGB Limited सोबत भागीदारी करुन साध्य केली आहे. सुरुवात Euro 5+ रेंज मधील बाईक्सपासून होणार असून, त्यात कंपनीचे प्रमुख मॉडेल Hunk 440 लॉन्च करण्यात आले आहे.
ब्रिटिश रायडर्ससाठी खास डिझाइन
Hunk 440 ही बाईक विशेषतः हाय-परफॉर्मन्स सेगमेंटसाठी तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या मते, ही बाईक ब्रिटिश रायडर्सच्या गरजा लक्षात घेऊन बनवली असून, ती स्टाईल, पॉवर आणि विश्वासार्हता देते.
हीरोची प्रतिक्रिया
हिरो मोटोकॉर्पचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट संजय भान म्हणाले की, “यूकेमध्ये आमचा प्रवेश हा आमच्या जागतिक विस्ताराच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. इटली आणि स्पेननंतर MotoGB सोबतची भागीदारी आमची युरोपियन उपस्थिती अधिक मजबूत करेल. Hunk 440 हे आमच्या त्या वचनाचे प्रतीक आहे, ज्यात आम्ही स्टाईल आणि परफॉर्मन्स दोन्ही गोष्टी किफायतशीर पॅकेजमध्ये देण्याचा प्रयत्न करतो.”
MotoGB ची भूमिका
MotoGB Limited यूकेमध्ये हीरोच्या उत्पादनांचे वितरण करणार आहे. सुरुवातीला कंपनीकडे 25 पेक्षा जास्त सेल्स आणि सर्व्हिस आउटलेट्स असतील, जे 2026 पर्यंत 35 हून अधिक ठिकाणी वाढवण्याची योजना आहे. कंपनी एक विस्तृत डीलर आणि सर्व्हिस नेटवर्क उभारणार असून, ग्राहकांना विक्रीनंतरच्या सेवांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.
MotoGB चे जनरल मॅनेजर मॅट के यांनी म्हटले की, “हीरो मोटोकॉर्पसोबत भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. दोन्ही कंपन्यांचे उद्दिष्ट म्हणजे ग्राहकांना उत्तम अनुभव आणि विश्वासार्ह सेवा प्रदान करणे आहे. Hunk 440 द्वारे आम्ही ब्रिटिश रायडर्सना तंत्रज्ञान आणि मूल्य यांचे अनोखे संयोजन देत आहोत.”
Hunk 440 ची किंमत आणि व्हेरियंट्स
Hunk 440 ची किंमत £3,499 (सुमारे ₹3.7 लाख) ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये £200 ऑन-रोड चार्जेस समाविष्ट आहेत.
ही बाईक तीन रंगांमध्ये Twilight Blue, Phantom Black आणि Titanium Grey उपलब्ध असेल.
कंपनी प्रत्येक बाईकवर 2 वर्षांची वॉरंटी देत आहे.