वाहन चालकांनो...15 लाखांचा अपघात विमाही बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:07 IST2018-09-24T15:53:54+5:302018-09-24T16:07:28+5:30
अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पैशांची मदत मिळणार असली तरीही कारचा विमाही महागणार आहे.

वाहन चालकांनो...15 लाखांचा अपघात विमाही बंधनकारक
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नव्या वाहनांना खरेदीवेळीच तीन वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स बंधनकारक केलेला असताना आता मालक-चालकाचा 15 लाखांचा अपघात विमा काढणेही बंधनकारक केले आहे. यासाठी वार्षिक 750 रुपये आकारले जाणार आहेत. यामुळे अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पैशांची मदत मिळणार असली तरीही कारचा विमाही महागणार आहे.
विमा क्षेत्रावर नियंत्रण ठेवणारी संस्था इरडाने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. यानुसार नव्या आणि जुन्या अशा दोन्ही वाहनांच्या चालकांचा आणि मालकांना 15 लाखांचा अपघात विमा काढावा लागणार आहे. यासाठी प्रारंभी 750 रुपये ठरविण्यात आले आहेत. इरडा काही काळाने यामध्ये वाढही करू शकते.
इरडाने सर्व विमा कंपन्यांना याबाबतचे आदेश दिले असून त्यांच्या पॉलिसींमध्ये तशी तरतूद करण्यास सांगितले आहे. अधासूचना काढल्यानंतर लगेचच किंवा 25 ऑक्टोबरपर्यंत अपघात विमा लागू करणे कंपन्यांना बंधनकारक राहणार आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच वाहन चालकांचा अपघात विमा 1 लाखांवरून 15 लाख करण्याच्या सुचना केल्या होत्या. इरडाच्या या निर्णयावर कंपन्यांनी असा विमा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी वेगळी रक्कम आकारण्याची मागणी केली आहे.
सध्या भारतात दुचाकी चालविणाऱ्यांसाठी 1 लाख आणि चार चाकी चालविणाऱ्यांसाठी 2 लाखांचा अपघात विमा असतो. विमा कंपन्या चालकाला जादाचा अपघात विमा देण्यासाठी मोठी रक्कम आकारतात. इरडाच्या या निर्णयामुळे वाहन चालकांचा फायदाच होणार आहे.