एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 11:43 IST2025-12-06T11:43:29+5:302025-12-06T11:43:58+5:30
जर, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नवी एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरू शकतो.

एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यानच कार कंपन्यांनी ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. अनेक वर्षांची प्रथा कायम ठेवत, जवळपास सर्वच कार कंपन्यांनी वर्षअखेरीस जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. या ऑफरचा सर्वाधिक फायदा एसयूव्ही सेगमेंटमधील खरेदीदारांना मिळणार आहे. जर, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून नवी एसयूव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर हा सुवर्णकाळ तुमच्यासाठी अगदी परफेक्ट ठरू शकतो. कारण, सध्या काही लोकप्रिय मॉडेल्सवर तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांपर्यंतची बंपर सूट जाहीर करण्यात आली आहे. जानेवारी २०२६ पासून गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याने, डिसेंबर महिना हा तुमच्यासाठी बचत करण्याची सर्वोत्तम संधी ठरणार आहे.
स्कोडा कुशाकवर सर्वाधिक सूट!
यावेळी डिस्काउंटच्या यादीत 'स्कोडा कुशाक' या मिड-साईज एसयूव्हीने बाजी मारली आहे. स्कोडा कंपनी 'कुशाक'वर तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांपर्यंतचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट देत आहे. कुशाकमध्ये १.० लीटर आणि १.५ लीटर टर्बो-पेट्रोलचे दमदार इंजिन पर्याय मिळतात,ज्यामुळे ड्रायव्हिंग अगदी स्मूद होते.
त्यानंतर, दमदार ऑफरच्या यादीत 'जीप कंपास' ही कार दुसऱ्या स्थानावर आहे. 'कंपास'वरही कंपनीने २ लाख ५५ हजार रुपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे. कंपासचे २.० लीटर डिझेल इंजिन आणि फोर-व्हील ड्राइव्ह क्षमता तिला या एसयूव्ही सेगमेंटमध्ये एक दमदार पर्याय बनवते. 'फोक्सवॅगन टायगून' ही गाडीदेखील या महिन्यात २ लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीत उपलब्ध आहे.
मिड-बजेटमध्येही जबरदस्त डील!
तुमचे बजेट जर १५ लाख रुपयांच्या आसपास असेल, तर 'होंडा एलिव्हेट' तुमच्यासाठी एक आकर्षक डील ठरू शकते. या एसयूव्हीवर या महिन्यात १ लाख ७६ हजार रुपयांपर्यंतची मोठी सूट मिळत आहे. बजेट एसयूव्हीच्या शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी 'निसान मॅग्नाईट'वर १ लाख ३६ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे, ज्यामुळे मॅग्नाईट पैसा वसूल डील ठरत आहे.
ऑफ-रोड किंग 'जिम्नी' आणि लोकप्रिय मॉडेल्सवरही सूट
ऑफ-रोडिंगची आवड असणाऱ्यांची लाडकी एसयूव्ही 'मारुती सुझुकी जिम्नी' देखील यात मागे नाही. 'जिम्नी'वर थेट १ लाख रुपयांपर्यंतची रोख सूट मिळत आहे. याशिवाय, 'किआ सेल्टॉस' आणि 'एमजी हेक्टर' यांसारख्या लोकप्रिय गाड्यांवरही ९०,००० रुपयांपर्यंतची आकर्षक सूट जाहीर करण्यात आली आहे.
छोटी SUV घेण्यातही मोठी बचत!
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये, फीचर्स आणि मायलेजसाठी प्रसिद्ध असलेल्या 'ह्यूंदाई एक्स्टर'वर देखील ८५,००० रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी आहे. कार्स मिळणारी ही सवलत कॅश डिस्काऊंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आणि मोफत ॲक्सेसरीजच्या स्वरूपात दिली जात आहे. त्यामुळे, नवीन वर्षात किमती वाढण्यापूर्वीच या संधीचा फायदा घ्या. या सवलतीचे आकडे डीलरशिप आणि मॉडेल-व्हेरियंटनुसार बदलू शकतात.