आता FASTag ची गरज नाही? लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम, टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:59 IST2024-08-27T13:34:33+5:302024-08-27T13:59:51+5:30
GNSS Toll System : सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहे.

आता FASTag ची गरज नाही? लवकरच सुरु होणार GNSS सिस्टम, टोल भरण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलणार!
Global Navigation Satellite System : भारतातील ऑटो इंडस्ट्रीमध्ये सतत काहीतरी नवीन अपडेट्स होताना दिसून येत आहे. यासोबतच टोलवसुलीतही वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत, टोल वसुलीसाठी पारंपारिक पद्धतीचा वापर केला जात होता. त्यानंतर FASTag ची सुविधा आणली.
मात्र, आता सरकार ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) टेक्नॉलॉजी आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीमची घोषणा केली होती. ही सिस्टम सध्या टेस्टिंगच्या टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. ही सिस्टम आल्यानंतर भारतात जुनी टोल सिस्टम रद्द केली जाऊ शकते.
काय आहे GNSS?
GNSS नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमवर आधारित असणार आहे. यात सॅटेलाइट आधारित युनिट असेल, जे वाहनांमध्ये बसवले जाईल. या सिस्टमच्या मदतीने अधिकाऱ्यांना सहजपणे ट्रॅक करता येईल की, कारने कधीपासून टोल महामार्गाचा वापर करायला सुरुवात केली आहे. कार टोल रस्त्यावरून निघताच, सिस्टम टोल रस्त्याच्या वापर कॅलक्युलेट करेल आणि आपल्या रक्कमेतून टोल वजा करेल.
GNSS सिस्टमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या सिस्टमच्या मदतीने प्रवासी फक्त तेवढेच पैसे देईल, जेवढा त्यांनी महामार्गाचा वापर केला आहे. तसेच, या सिस्टममुळे प्रवाशांना किती टोल भरावा लागणार आहे, हे देखील कळू शकेल आणि त्यानुसार ते भरू शकतील. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे ही सिस्टम आल्यानंतर पारंपारिक टोलनाकेही काढून टाकले जातील, जिथे कधी-कधी लांबच लांब रांगा लागत होत्या.
कधीपर्यंत नवीन सिस्टम येईल?
सध्या सरकारने याबाबतची तारीख जाहीर केलेली नाही, मात्र देशातील दोन प्रमुख महामार्गांवर या सिस्टमची टेस्टिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील बंगळुरू-म्हैसूर राष्ट्रीय महामार्ग (NH-257) आणि हरयाणातील पानिपत-हिसार राष्ट्रीय महामार्ग (NH-709) यांचा समावेश आहे. सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच टप्प्याटप्प्यानं या सिस्टमची अंमलबजावणी केली जाईल.