General Motors in trouble; During the recession 48,000 workers were on strike | जनरल मोटर्स अडचणीत; मंदीच्या काळातच 48 हजार कर्मचारी संपावर
जनरल मोटर्स अडचणीत; मंदीच्या काळातच 48 हजार कर्मचारी संपावर

अमेरिकेची मोठी वाहन निर्माता कंपनी जनरल मोटर्स ऐन मंदीच्या काळात अडचणीत आली आहे. कंपनीच्या कामगार संघटनेसोबत पगारवाढीची बोलणी फिस्कटल्याने तब्बल 48 हजारावर कर्मचारी रविवारी रात्रीपासून संपावर गेले आहेत. यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रपतींना याची दखल घ्यावी लागली आहे. 


जनरल मोटर्सचे भारतातही प्रकल्प आहेत. मात्र, या कंपनीने शेवरोलेचा ब्रँड दोन वर्षांपूर्वीच बंद केला होता. अमेरिकेच्या नऊ राज्यांमध्ये कंपनीचे 33 प्रकल्प आहेत. तसेच 22 पार्ट्स डिस्ट्रीब्युशन युनिट आहेत. यातील जवळपास 48 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. 


युएडब्ल्यूने ट्विट करून ही माहिती दिली आहे. कंपनीतील कामगार संघटनेच्या नेत्यांनी डेट्रॉएटमध्ये चर्चा करून रविवारी रात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. संप सुरू होण्याआधी राष्ट्रपती ट्रम्प यांनीही ट्विट करत म्हटले की, जनरल मोटर्स आणि युनायटेड ऑटो वर्कर्समध्ये पुन्हा वाद सुरू झाला आहे. दोघांनी एकत्र येऊन वाद सोडविला पाहिजे. 


तर जनरल मोटर्सने सांगितले की, युएडब्ल्य़ूने संपावर जाण्याचा निर्णय घेतला तो निराशाजनक आहे. आम्ही वेतन करारावर चांगली ऑफर ठेवली होती. अमेरिकेच्या प्रकल्पांमध्ये 700 कोटी डॉलर गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. तसेही कार उद्योग मंदीच्या फेऱ्यातून जात आहे आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी वाढलेल्या गुंतवणूकीमुळे खर्च वाढत चालला आहे. 


2007 मध्ये झालेले 30 कोटी डॉलरचे नुकसान
अमेरिकेच्या वाहन उद्योगामध्ये 12 वर्षांतील काम बंदची ही पहिली घटना आहे. याआधी युनियनने देशव्यापी संप 2007 मध्ये केला होता. तेव्हा 73 हजार कामगारांनी दोन दिवसांसाठी कामावर जाण्यास विरोध केलो होता. यामुळे कंपनीला 30 कोटी डॉलरचे नुकसान झाले होते.


Web Title: General Motors in trouble; During the recession 48,000 workers were on strike
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.