ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 06:40 IST2022-01-03T06:40:43+5:302022-01-03T06:40:57+5:30
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी धोरण जाहीर केले आहे.

ई-वाहनांचा इंधन खर्च प्रतिकिमी १ रुपया; मुंबई-ठाण्यात ई-रिक्षांना चांगले दिवस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इलेक्ट्रिक वाहनाला इंधनाचा खर्च १ किमीसाठी १ रुपया एवढा अल्प आहे. पेट्रोल वाहनांसाठी हा खर्च दहा रुपयांवर जातो. मात्र बदलती धोरणे आणि सुविधा लक्षात घेता इलेक्ट्रिक रिक्षा (एल ५ एम) हाच पुढील काळात चांगला पर्याय ठरणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिली.
मुंबई महानगरातील रिक्षा प्रवाशांचे- रिक्षाचालकांचे प्रश्न ‘लोकमत’ने सातत्याने मांडले होते. त्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणाने सविस्तर उत्तरे दिली, हे प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचा तपशीलही दिला. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या भवितव्याबद्दलही भाष्य केले.
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने इलेक्ट्रिक वाहनासाठी धोरण जाहीर केले आहे. त्यात रस्ता कर, नोंदणी शुल्क पूर्ण माफ करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक गाडी घेणाऱ्यांना ३० हजारांची सबसिडी देण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या रिक्षा सीएनजीवर आल्या. आता त्या इलेक्ट्रिक व्हाव्या, असे सरकारचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा महानगरांतील प्रदूषणावर मात करण्यासाठी त्याचा फायदा होईल.