खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 16:37 IST2025-09-04T16:35:38+5:302025-09-04T16:37:46+5:30
August 2025 Electric Two-Wheeler Sales: वाहन पोर्टलनुसार ३१ ऑगस्टपर्यंतचे टीव्हीएस, बजाज, ओला, एथर, विडा यासारख्या ईलेक्ट्रीक दुचाकींचे आकडे समोर आले आहेत. जे धक्कादायकच आहेत.

खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
ऑगस्टमधील इलेक्ट्रीक स्कूटरच्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. बजाजची पुरती वाट लागल्याचे यावरून दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी एक नंबरवर असलेली बजाज चेतक थेट पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. कंपनीची सर्व्हिस, स्कूटरमधील एका मागोमाग एक संपत नसलेल्या समस्या यामुळे आधीचे ग्राहक त्रस्त झालेले आहेत. याचा फटका एवढा बसला की ऐन उत्सव काळातदेखील बजाजला स्कूटर विक्री करताना नाकीनऊ आले आहेत.
वाहन पोर्टलनुसार ३१ ऑगस्टपर्यंतचे टीव्हीएस, बजाज, ओला, एथर, विडा यासारख्या ईलेक्ट्रीक दुचाकींचे आकडे समोर आले आहेत. टीव्हीएसने गेल्या काही महिन्यांपासूनचा आपला पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. बजाज इलेक्ट्रीक आणि टीव्हीएसमध्ये पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ होती. ती आता संपुष्टात आली आहे. टीव्हीएसने एवट्या आयक्यूबच्या जिवावर 24,087 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत ही वाढ ३७ टक्के आहे.
गेल्या काही काळापासून विक्रीसाठी झुंझत असलेल्या ओला कंपनीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने 18,972 युनिट्स विकल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्या ३१ टक्के कमी आहेत. एथर एनर्जीने १७,८५६ युनिट्स विकत तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५% एवढी मोठी वाढ आहे. बजाजवर एवढी वाईट परिस्थिती आलीय की तिला हिरो मोटोकॉर्पच्या विडा ब्रँडनेही मागे टाकले आहे. विडाने १३,३१३ स्कूटर विकल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही १८० टक्के एवढी मोठी वाढ आहे.
पाचव्या क्रमांकावर बजाजला समाधान मानावे लागले आहे. बजाज चेतकच्या ग्राहकांना एवढा मनस्ताप सहन करावा लागत आहे की, दर ५००० किमीसाठी दिलेल्या रेग्युलर सर्व्हिसिंगची गाडी ग्राहकांना पाचपाच- सहा दिवस परत मिळत नाही. दुरुस्तीसाठी आलेल्यांना तर १५-२० दिवस कुठेच चुकलेले नाहीत. साधे सस्पेंशन बदलण्यासाठी १७-१८ दिवस गाडी बजाज सर्व्हिस सेंटरला सोडावी लागत आहे, हे हाल बजाजचे माहेरघर असलेल्या पुण्यात सुरु आहेत. देशभरात तर कल्पनाही न केलेली बरी, अशी अवस्था ग्राहकांची आहे. बजाजने या ऑगस्टमध्ये 11,730 युनिट्स विकले आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये एकूण १,०३,८०२ इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या आहेत.