इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
By हेमंत बावकर | Updated: September 25, 2025 10:26 IST2025-09-25T10:24:25+5:302025-09-25T10:26:16+5:30
Ethanol blend Petrol and Second Hand Cars: अनेकांचे नवीन कार घेण्याचे बजेट नसते. यामुळे हे लोक सेकंड हँड कार घेऊन आपले कारचे स्वप्न आणि गरज पूर्ण करतात. परंतू, २०२२ किंवा त्यापूर्वीची वाहने घेताना थोडा विचार करावा लागणार आहे.

इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
- हेमंत बावकर
सध्या इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा त्रास २०२२ पूर्वी वाहने घेतलेल्या वाहन मालकांना होत आहे. सोशल मीडियातच नाही तर वाहन चालक प्रत्यक्षात देखील आपल्या गाडीचे मायलेज आधी १६ होते, आता ती ११ द्यायला लागली आहे, असे उघडपणे सांगत आहेत. मेन्टेनन्स वाढत चालल्याची ओरड तर मारली जातच आहे. अशातच टोयोटासारख्या कंपन्यांनी देखील या काळातील गाड्यांना सांगितलेलेच पेट्रोल वापरा असा इशारा दिला आहे. अशातच सेकंड हँड कार बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
अनेकांचे नवीन कार घेण्याचे बजेट नसते. यामुळे हे लोक सेकंड हँड कार घेऊन आपले कारचे स्वप्न आणि गरज पूर्ण करतात. परंतू, २०२२ किंवा त्यापूर्वीची वाहने घेताना थोडा विचार करावा लागणार आहे. कारण या कार किंवा दुचाकीमध्ये साधे पेट्रोल वापरावे लागते. आता काही कंपन्यांनी इथेनॉल वापरले तरी आम्ही वॉरंटी देणार असल्याचे जरी जाहीर केले असले तरी त्या वाहनांवर वॉरंटी घेतलेली किंवा कंपन्यांनी वाढविलेली असणे अशक्य आहे. यामुळे हे फक्त सांगण्यापुरतेच राहणार आहे. आधीच्या मालकाने जर एक्स्टेंडेड वॉरंटी घेतली असेल तरच हे वापरलेले वाहन वॉरंटीत असणार आहे. ते देखील फारतर एक वर्ष. त्यापुढे तुम्हालाच दुरुस्तीचा खर्च करावा लागणार आहे.
यामुळे सेकंड हँड गाडी घेताना जर तुम्ही २०२२ किंवा त्यापूर्वीची गाडी घेत असाल तर पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. आधीच जुनी कार असल्याने मेन्टेनन्सची भीती असते, त्यात पुन्हा हा इथेनॉलचा डंख हैराण करणार आहे. यामुळे थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील परंतू, E20 पेट्रोलसाठी योग्य असलेली म्हणजेच २०२३ पासून मॅन्युफॅक्चर झालेली कार, बाईक घेणे सोईस्कर राहणार आहे.
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
जुन्या गाड्यांवर पैसेही वाचू शकतील...
जर तरीही तुम्हाला २०२२ किंवा त्यापूर्वीची गाडी घ्यायची असेल किंवा मिळत असेल तर तुम्ही ई२० पेट्रोलच्या समस्येमुळे या गाडीची किंमत कमी करण्यासाठी चांगल्याप्रकारे बार्गेनिंग देखील करण्याची तयारी ठेवा. असे केल्यास तुम्हाला कमी किंमतीत साध्या पेट्रोल किंवा १० टक्के इथेनॉलवर चालणारी गाडी मिळू शकेल.
(टीप: जुनी गाडी घेताना तुमच्या ओळखीच्या मेकॅनिकचा सल्ला घ्यावा, मेकॅनिककडून किंवा जाणकारांकडून गाडीची पीडीआय करून घ्यावी.)