दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 14:38 IST2026-01-02T14:36:28+5:302026-01-02T14:38:44+5:30
Innova Crysta discontinue: इनोव्हा एक ब्रँड झाला होता. कंपनीने त्यात वेळोवेळी बदल केले, नाव बदलले आता क्रिस्टाची चलती होती.

दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
भारतीय रस्त्यांचा राजा मानली जाणारी आणि लाखो भारतीयांच्या पसंतीस उतरलेली एमव्हीपी टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आता निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. टोयोटा मार्च २०२७ पर्यंत इनोव्हा क्रिस्टाचे डिझेल मॉडेल बंद करण्याची शक्यता आहे. कडक होत चाललेले उत्सर्जनाचे नियम आणि कंपनीचा 'हायब्रिड' तंत्रज्ञानाकडे वाढलेला कल हे या निर्णयामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
ऑटोकार इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, भारत सरकार आगामी काळात 'कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी'च्या तिसऱ्या टप्प्यातील कडक नियम लागू करणार आहे. या नियमांची पूर्तता करणे मोठ्या डिझेल इंजिन असलेल्या गाड्यांसाठी कठीण आणि खर्चिक ठरणार आहे. CAFE नियम हे वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या सर्व गाड्यांमधून होणाऱ्या सरासरी $CO_2$ (कार्बन डायऑक्साइड) उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी असतात.इनोव्हा क्रिस्टा ही जड 'लॅडर-फ्रेम' चेसिसवर बनलेली आहे आणि तिचे इंजिन डिझेल आहे. ही रचना उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने हायब्रिड किंवा पेट्रोल इंजिनच्या तुलनेत मागे पडते. क्रिस्टासारख्या जड डिझेल गाड्या विक्रीत राहिल्यास टोयोटाला मोठी दंड सोसावा लागू शकतो.
यामुळे टोयोटा सध्या इनोव्हा हायक्रॉसवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. हायक्रॉस ही पर्यावरणपूरक असून तिची इंधन कार्यक्षमता देखील जास्त आहे. क्रिस्टा हे मॉडेल जवळपास १० वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत विकले जात आहे. नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या बदलत्या आवडीमुळे आता ही गाडी निवृत्त करण्याचा विचार कंपनी करत आहे. परंतू, दोन्ही गाड्यांच्या किंमतीत मोठा फरक आहे. तो टोयोटाचा ग्राहक कसा भरून काढणार, हे देखील गणित कंपनीला घालावे लागणार आहे.
इनोव्हा क्रिस्टाचा वारसा
२०१६ मध्ये लाँच झाल्यापासून इनोव्हा क्रिस्टाने भारतीय एमपीव्ही मार्केटवर राज्य केले. तिच्या दमदार २.४ लिटर डिझेल इंजिनमुळे ती लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आणि टॅक्सी व्यवसायासाठी पहिली पसंती ठरली. सध्या ही गाडी केवळ डिझेल आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे.