टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:58 IST2025-12-31T08:57:11+5:302025-12-31T08:58:09+5:30
Electric Three Wheeler Subsidy Stopped: अवजड उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्ससाठी जे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे.

टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. देशातील इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्स (ई-रिक्षा) साठी देण्यात येणारे अनुदान केंद्र सरकारने तातडीने बंद केले आहे. यामुळे आता नवीन इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे.
अवजड उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'पीएम ई-ड्राइव्ह' योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्ससाठी जे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते पूर्ण झाले आहे. या योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात ई-रिक्षांची विक्री झाल्याने सरकारने आता या श्रेणीसाठी दिलेले अनुदान थांबवले आहे.
का बंद झाले अनुदान?
सरकारने या योजनेअंतर्गत ठराविक संख्येने थ्री-व्हीलर्सना अनुदान देण्याचे निश्चित केले होते. ही मर्यादा ओलांडली गेल्याने सबसिडीच्या पोर्टलवर नवीन नोंदणी थांबवण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत व्यावसायिक वापरासाठी इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर्सना प्रचंड मागणी होती. ही मागणी पाहता सरकारी तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
आत्तापर्यंत इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर खरेदी करताना ग्राहकांना २५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत सबसिडी मिळत होती. आता हे अनुदान बंद झाल्यामुळे वाहनांच्या किमती थेट तेवढ्याच रकमेने वाढणार आहेत. याचा सर्वाधिक फटका स्वयंरोजगार करणाऱ्या रिक्षाचालकांना बसण्याची शक्यता आहे.
दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे काय?
दिलासादायक बाब म्हणजे, इलेक्ट्रिक दुचाकी आणि इतर काही श्रेणींसाठी अद्याप अनुदान सुरू आहे. मात्र, तेथेही ठराविक कोटा संपल्यानंतर सबसिडी बंद होऊ शकते. त्यामुळे ई-स्कूटर घेण्याचा विचार करणाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणे फायद्याचे ठरेल.