Electric Scooter Fire: वाचला! स्कूटरवर बसला नाही तोच टुणकन उडी मारली; आधी धूर आणि नंतर पेटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 20:47 IST2022-04-30T20:46:54+5:302022-04-30T20:47:19+5:30
आज आणखी एका स्कूटरला आग लागल्याची घटना घडली आहे. इलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत.

Electric Scooter Fire: वाचला! स्कूटरवर बसला नाही तोच टुणकन उडी मारली; आधी धूर आणि नंतर पेटली
सुर्याची उष्णता आणि वाढलेले तापमान, यातच पैसे वाचतील म्हणून हौशेने विकत घेतलेल्या स्कूटर आता जिवावर बेतू लागल्या आहेत. इलेक्ट्रीक स्कूटरच्या सुरक्षेबाबत आता खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे. कोणाचा रात्री झोपलेला असताना घरात गुदमरून मृत्यू झालाय तर कोणाला या स्कूटरच्या नादुरुस्तीमुळे दुखापती सहन कराव्या लागल्या आहेत.
आज आणखी एका स्कूटरला आग लागल्याची घटना घडली आहे. इलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीएत. तामिनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसुरमध्ये ही आग लागली आहे. शनिवारी, म्हणजे आजच या औद्योगिक नगरीमध्ये एका स्कूटरला आग लागली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कटर त्या मालकाने एका वर्षापूर्वी विकत घेतलेली आहे.
ही आगीची घटना पाहून आजुबाजुच्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. या स्कूटरचा मालक बंगळुरूच्या एका खासगी कंपनीत सुपरवायझर आहे. तो त्या स्कूटरवर बसलाच होता, की सीटखाली स्फोटाचा आवाज झाला, खालून धूर येऊ लागला. जिवाच्या आकांताने त्याने तशीच उडी मारली आणि स्कूटरपासून दूर गेला. सतीश थोडा लांब जात नाही तोच आगीचा भडका उडाला आणि स्कूटर जळू लागली. लोकांनी मिळून आग विझविण्याच्या प्रयत्न केला परंतू तोवर स्कूटर जळाली होती.
गेल्या महिन्या दोन महिन्यांत इलेक्ट्रीक स्कूटरला आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. अगदी हायफाय स्कूटर ओलापासून ते भारतीय असल्याचा दावा करणारी चिनी कॉपी ओकिनावासह अन्य कंपन्यांच्या स्कूटर जळाल्या आहेत. सरकारनेही या कंपन्यांना जोवर समस्या दूर होत नाही, तोवर नवीन स्कूटरचे लाँचिंग न करण्याचे आदेश दिले आहेत.