इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:13 IST2025-07-17T06:13:40+5:302025-07-17T06:13:50+5:30
२०२८ पर्यंत भारतात इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे नव्या उंचीवर जाणार; महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारने प्रोत्साहन दिल्याने झाला फायदा

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशात इलेक्ट्रिक कार विक्रीचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत २१ पट वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये जवळपास ५ हजार इलेक्ट्रिक कार्स विकल्या गेल्या, तर गेल्या आर्थिक वर्षात ही संख्या १,०७,००० हून अधिक झाली आहे. इलेक्ट्रिक कार विक्रीचे प्रमाण २०२८ पर्यंत ७% पेक्षा अधिक होईल, असा अंदाज केअरएज ॲडव्हायजरीने व्यक्त केला आहे. नवीन मॉडेल लाँचेस, सरकारी प्रोत्साहन योजना आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढ यामुळे ही घोडदौड अधिक वेगाने होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एकूण ईव्ही विक्रीत इलेक्ट्रिक चारचाकीचा वाटा अजूनही कमी आहे. दुचाकी, तीन चाकी वाहनांवर अधिक भर दिला जात आहे. पण आता चार चाकी वाहनांची विक्री वेगाने वाढत आहे. ईव्ही घेण्याचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने का वाढली?
महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूर ही शहरे इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्रस्थानी.
१,९९५ कोटी रुपयांचा प्रोत्साहन भत्ता; २० लाखांपर्यंत बससाठी अनुदान.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी; प्रत्येक २५ किमीवर चार्जिंग स्टेशन
३,७४६
चार्जिंग स्टेशन एकट्या महाराष्ट्रात आहेत. प्रथम स्थानी कर्नाटक असून
येथे ५,८८० चार्जिंग स्टेशन आहेत.
२६,००० चार्जिंग स्टेशन
ईव्ही घेण्याचा विचार करणाऱ्यांसमोर मोठा अडथळा हा चार्जिंग सुविधांचा होता. मात्र, गेल्या तीन वर्षांत यात प्रगती झाली आहे. २०२५ मध्ये चार्जिंग स्टेशन २६,००० च्या पुढे गेले आहेत.
काही कंपन्या देखील घरगुती चार्जर आणि फास्ट चार्जिंग कॉरिडॉर उभारण्यावर भर देत आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर वाढले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
किमती कमी होणार : इलेक्ट्रिक वाहनाच्या किमतीत बॅटरीचा वाटा ३५ ते ४५% असतो. सध्या भारत १००% लिथियम आयन बॅटरी सेल आयात करतो. परंतु २०२७ पर्यंत हे प्रमाण २०%वर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे बॅटरीची किंमत २०-२५% कमी होईल