वर्षात गेम कसा फिरला, ओलाच्या जागेवर आली टीव्हीएस...! एथरने तर मार्चमध्ये कहरच केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:52 IST2026-04-01T14:52:25+5:302026-04-01T14:52:54+5:30
Electric 2W Sales March 2026: मार्च २०२६ मध्ये १.९१ लाख इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री! TVS Orbiter आणि Bajaj Chetak ची धूम, तर Ola च्या विक्रीत ५७% घट. वाचा कोणत्या कंपनीने मारली बाजी.

वर्षात गेम कसा फिरला, ओलाच्या जागेवर आली टीव्हीएस...! एथरने तर मार्चमध्ये कहरच केला...
मार्च २०२६ हा महिना भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रासाठी सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. देशात एकूण १,९०,९४१ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली असून, यातील ९५% हिस्सा केवळ १० मोठ्या कंपन्यांनी काबीज केला आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणाऱ्या ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत मोठी घट झाली असून ती पाचव्या क्रमांकावर आलेली आहे, तर टीव्हीएस प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे.
टीव्हीएसची ऐतिहासिक झेप
टीव्हीएसने मार्च महिन्यात ४९,३०० पेक्षा जास्त गाड्यांची विक्री करून २६% मार्केट शेअर मिळवला आहे. कंपनीच्या 'बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस' (BaaS) या लवचिक मालकी मॉडेलमुळे आणि नवीन 'ऑर्बिटर' मॉडेलच्या लाँचमुळे ग्राहकांनी टीव्हीएसला पसंती दिली आहे.
बजाज आणि एथरची दमदार कामगिरी
बजाज (Bajaj): केवळ 'चेतक'च्या जोरावर बजाजने ४६,००० युनिट्सची विक्री करत दुसरे स्थान पटकावले आहे. स्वस्त दरातील 'C2501' मॉडेलने मध्यमवर्गीयांना आकर्षित केले.
एथर एनर्जी
बेंगळुरूच्या या स्टार्टअपची वाढ थक्क करणारी आहे. मार्चमध्ये ३५,७०० युनिट्स विकून एथरने तिसरे स्थान निश्चित केले असून वर्षभरात २ लाखांहून अधिक विक्रीचा टप्पा पहिल्यांदाच पार केला आहे.
ओला इलेक्ट्रिकला घरघर?
टॉप १० कंपन्यांमध्ये ओला ही एकमेव कंपनी आहे जिच्या विक्रीत घट (५७% वार्षिक घट) झाली आहे. मार्च २०२५ मध्ये २३,५०० गाड्या विकणाऱ्या ओलाची विक्री आता केवळ १०,००० वर आली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात तर ओलाला अँम्पिअर या कंपनीने देखील मागे टाकले होते. यामुळे ओलाने पुन्हा थोडासा डिस्काऊंट सुरु केल्याचे दाखविले होते. पाडवा, सबसिडी बंद होण्याच्या भीतीमध्ये ओलाला फेब्रुवारीच्या तुलनेत दुप्पट विक्री करता आली आहे.
उदयोन्मुख स्टार्टअप्सचा बोलबाला
रिव्हर मोबिलिटी आणि सिम्पल एनर्जी सारख्या बेंगळुरूस्थित स्टार्टअप्सनी अनुक्रमे ४१७% आणि ३५२% अशी अवाढव्य वाढ नोंदवली आहे.