E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:23 IST2025-10-11T13:22:04+5:302025-10-11T13:23:02+5:30
E20 Ethanol Free Petrol List: जाणून घ्या कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणते नाही, भारतातील बहुतेक सर्व पेट्रोल पंपवर मिळणारे सामान्य तसेच प्रीमियम पेट्रोल आता E20 मिश्रित आहे. पण तुमच्याकडे दोन पर्याय आहेत...

E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
नवी दिल्ली: भारतात E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल लागू झाल्यापासून वाहनचालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः, प्रीमियम पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण असते की नाही, याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
एका सविस्तर अहवालानुसार, भारतातील बहुतेक सर्व पेट्रोल पंपवर मिळणारे सामान्य तसेच प्रीमियम पेट्रोल आता E20 मिश्रित आहे. यामध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमचे ‘पॉवर 95’, इंडियन ऑइलचे ‘XP95’ आणि ‘XP99’, तसेच भारत पेट्रोलियमचे ‘स्पीड 97’, शेलचे व्ही पॉवर यांसारख्या लोकप्रिय प्रीमियम ब्रँड्सचा समावेश आहे. त्यामुळे, प्रीमियम पेट्रोलमध्ये इथेनॉल नसते हा एक मोठा गैरसमज आहे, तो आता दूर झाला आहे.
परंतु, ज्यांना आपल्या वाहनासाठी पूर्णपणे इथेनॉल-मुक्त पेट्रोल हवे आहे, त्यांच्यासाठी एक पर्याय अजूनही उपलब्ध आहे. इंडियन ऑइलचे ‘XP100’ आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे ‘पॉवर 100’ हे 100-ऑक्टेन रेटिंग असलेले अल्ट्रा-प्रीमियम पेट्रोल जवळजवळ पूर्णपणे इथेनॉल-मुक्त आहेत. हे पेट्रोल विशेषतः हाय-परफॉर्मन्स गाड्यांसाठी वापरले जाते.
प्रीमियम पेट्रोलचे फायदे कायम
जरी प्रीमियम पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचे मिश्रण असले तरी, त्याचे फायदे कमी झालेले नाहीत. या पेट्रोलमध्ये विशेष प्रकारचे अॅडिटीव्ह्ज (additives) वापरले जातात, जे इंजिनला गंजण्यापासून वाचवतात, त्याची कार्यक्षमता वाढवतात आणि गाडीला उत्तम मायलेज देण्यास मदत करतात. त्यामुळे, E20 मिश्रण असूनही प्रीमियम पेट्रोल वापरणे वाहनासाठी फायदेशीर ठरते. थोडक्यात, भारतातील जवळजवळ सर्व पेट्रोल आता E20 मिश्रित आहे, केवळ 100-ऑक्टेन पेट्रोल याला अपवाद आहे.