ऐन वेळी कार दगा देणार? बॅटरी डाऊन होण्यापूर्वी गाडी देते 'हे' ५ इशारे; वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:52 IST2026-04-01T13:52:17+5:302026-04-01T13:52:58+5:30
कारची बॅटरी खराब होण्यापूर्वी गाडी काही महत्त्वाचे संकेत देते. इंजिन स्टार्ट होण्यास उशीर होणे किंवा डॅशबोर्डवर वॉर्निंग लाईट दिसणे यांकडे दुर्लक्ष करू नका.

ऐन वेळी कार दगा देणार? बॅटरी डाऊन होण्यापूर्वी गाडी देते 'हे' ५ इशारे; वेळीच व्हा सावध!
महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडलात आणि मध्येच कारने दगा दिला, तर होणारा मनस्ताप शब्दांच्या पलीकडे असतो. अनेकदा कार अचानक बंद पडण्याचे किंवा स्टार्ट न होण्याचे मुख्य कारण बॅटरी खराब होणे हे असते. साधारणपणे कारची बॅटरी ३ ते ५ वर्षे टिकते, पण हवामान आणि देखभालीनुसार तिचे आयुष्य कमी-जास्त होऊ शकते. विशेष म्हणजे, बॅटरी पूर्णपणे खराब होण्यापूर्वी कार काही विशिष्ट संकेत देते. या संकेतांकडे वेळीच लक्ष दिले, तर तुम्ही रस्त्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवू शकता.
१. इंजिन स्टार्ट व्हायला वेळ लागणे
जर तुमची कार पूर्वीसारखी एका सेल्फमध्ये स्टार्ट होत नसेल किंवा चावी फिरवल्यानंतर इंजिनमधून वेगळा आवाज येत असेल, तर समजा बॅटरी कमकुवत झाली आहे. जर तुम्हाला वारंवार 'जंप स्टार्ट'ची मदत घ्यावी लागत असेल, तर बॅटरी बदलण्याची वेळ आली आहे, हे नक्की.
२. डॅशबोर्डवरील बॅटरी सिग्नल
कार चालवताना समोरच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बॅटरीचा लाल आयकॉन किंवा वॉर्निंग लाईट दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा सिग्नल बॅटरी किंवा चार्जिंग सिस्टममध्ये बिघाड असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
३. इलेक्ट्रिकल फीचर्समध्ये बिघाड
बॅटरी कमकुवत झाली की, त्याचा परिणाम गाडीच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टिमवर होतो. हेडलाईट्सचा प्रकाश कमी होणे, पॉवर विंडो हळू चालणे किंवा म्युझिक सिस्टम वारंवार बंद पडणे, असे प्रकार घडत असतील तर तुमची बॅटरी आता शेवटची घटका मोजत आहे, असे समजावे.
४. बॅटरीचा आकार बदलणे किंवा दुर्गंधी येणे
बॅटरीचा बाहेरचा भाग फुगलेला दिसत असेल किंवा बॅटरीजवळून काही विचित्र उग्र वास येत असेल, तर ते ओव्हरहिटिंग किंवा केमिकल लीकेजचे लक्षण आहे. अशा स्थितीत बॅटरी कधीही निकामी होऊ शकते, त्यामुळे ती तातडीने तज्ज्ञांकडून तपासून घ्या.
५. टर्मिनलवर गंज जमा होणे
बॅटरीच्या कनेक्शन पॉईंट्सवर पांढऱ्या किंवा निळ्या रंगाचा पदार्थ जमा झालेला दिसल्यास, करंट फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो. वारंवार साफ करूनही असा गंज जमा होत असेल, तर बॅटरीने आपली मर्यादा ओलांडली आहे, हे समजून जावे.
काय कराल?
रस्त्यात होणारी फजिती टाळण्यासाठी दर काही महिन्यांनी बॅटरीचे व्होल्टेज तपासून घ्या आणि टर्मिनल साफ ठेवा. जर वरीलपैकी कोणतेही संकेत मिळत असतील, तर नजीकच्या गॅरेजमध्ये जाऊन बॅटरी बदलून घेणेच शहाणपणाचे ठरेल.