कुवेतच्या राजाने घेतली, पण कधी चालविलीच नाही! १७ वर्षे धूळ खात पडून होती 'ही' भंगार कार; आता मिळणार २५ कोटींहून अधिक किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:03 IST2026-02-24T14:02:02+5:302026-02-24T14:03:03+5:30
Bugatti EB 110 Auction: कुवेतच्या राजघराण्याची जुनी Bugatti EB 110 हायपरकार आता २५ कोटींहून अधिक किमतीत विकली जाणार आहे. या कारचा रंजक इतिहास आणि तिचे खास फीचर्स जाणून घ्या.

कुवेतच्या राजाने घेतली, पण कधी चालविलीच नाही! १७ वर्षे धूळ खात पडून होती 'ही' भंगार कार; आता मिळणार २५ कोटींहून अधिक किंमत
कुवेत : एखाद्या जुन्या आणि भंगार अवस्थेत असलेल्या कारची किंमत किती असू शकते? काही हजार किंवा लाख? पण कुवेतच्या राजघराण्यातील एका 'बुगाटी' कारने सर्वांनाच थक्क केले आहे. तब्बल १७ वर्षे गॅरेजमध्ये धूळ खात पडलेली आणि इंजिन पूर्णपणे जाम झालेली ही कार आता २५ कोटी रुपयांहून अधिक किमतीत विकली जाणार आहे.
ही कार दुसरी-तिसरी कोणती नसून १९९१ मधील प्रसिद्ध 'बुगाटी EB 110' ही हायपरकार आहे. कुवेतच्या राजघराण्याने २००५ मध्ये ही कार सुमारे ३ कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र, खरेदी केल्यानंतर ही कार रस्त्यावर उतरण्याऐवजी गॅरेजच्या एका कोपऱ्यात उभी करून ठेवण्यात आली. तब्बल १७ वर्षांनंतर जेव्हा ही कार बाहेर काढण्यात आली, तेव्हा तिची अवस्था अत्यंत वाईट होती; इंजिन निकामी झाले होते आणि अनेक महत्त्वाचे सुटे भाग गंजले होते.
लक्झेंबर्गमधील तज्ज्ञांनी या कारचे पुनरुज्जीवन करण्याचे आव्हान स्वीकारले. त्यांनी कारचा एक-एक भाग सुटा करून ती मूळ स्वरूपात आणली. कठीण परिश्रम आणि बारकाईने केलेल्या कामामुळे आता ही कार ९० च्या दशकातील तिच्या लॉन्चिंगच्या वेळेसारखीच चकाचक आणि वेगवान झाली आहे.
बुगाटी EB 110 ची वैशिष्ट्ये:
इंजिन: ३.५ लिटर, ६०-वॉल्व्ह V12 इंजिन.
वेग: केवळ ३.२६ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडण्याची क्षमता.
टॉप स्पीड: ३४३ किमी/तास.
दुर्मिळता: जगभरात अशा केवळ १३९ कार तयार करण्यात आल्या होत्या.
तज्ज्ञांच्या मते, या कारचे ऐतिहासिक महत्त्व आणि तिचे झालेले 'रेस्टोरेशन' लक्षात घेता, लिलावात तिची किंमत २५ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते.