Royal Enfield ला मोठे आव्हान! लवकरच येणार Triumph ची 350cc बाइक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:44 IST2026-02-27T14:43:12+5:302026-02-27T14:44:04+5:30
Triumph ने ही बाइक लॉन्च केल्यानंतर, तर येत्या काळात या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होणार.

Royal Enfield ला मोठे आव्हान! लवकरच येणार Triumph ची 350cc बाइक
ब्रिटिश मोटरसायकल उत्पादक Triumph भारतात 350cc क्षमतेच्या बाइक्सची नवी रेंज सादर करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एप्रिल 2026 पर्यंत ही नवी रेंज बाजारात दाखल होऊ शकते. जर तसे झाले, तर Royal Enfield सह मिड-कॅपेसिटी सेगमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
नव्या 350cc इंजिनचे डेव्हलपमेंट सुरू
सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रायम्फ सध्या आपल्या विद्यमान 398cc प्लॅटफॉर्मवर आधारित एक पूर्णपणे नवीन, 350cc पेक्षा कमी क्षमतेचे इंजिन विकसित करत आहे. मात्र, हे नवीन मॉडेल्स बाजारात आल्यानंतर सध्याची 400cc बाइक रेंज सुरू राहणार की बंद होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
जीएसटी धोरणाचा मोठा प्रभाव
भारत सरकारने गेल्या वर्षी सुधारित जीएसटी कर प्रणाली लागू केली होती. त्यानुसार, 350cc पेक्षा कमी क्षमतेच्या बाइक्सवरील जीएसटी 18 टक्के करण्यात आला आहे, तर 350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या बाइक्सवर तब्बल 40 टक्के कर आकारला जातो. याच पार्श्वभूमीवर बजाज ऑटो, केटीएम आणि ट्रायम्फ एकत्रितपणे या नव्या इंजिनवर काम करत असल्याचे सांगितले जाते.
Royal Enfield सह मोठ्या ब्रँड्सना फटका?
या बदलाचा थेट परिणाम रॉयल एनफील्ड, बजाज, ट्रायम्फ आणि केटीएमसारख्या कंपन्यांवर होणार आहे. सध्या बजाज ऑटो डोमिनार 400 आणि पल्सर NS400 विक्री करते, तर ट्रायम्फकडे स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400X उपलब्ध आहेत. केटीएमच्या पोर्टफोलिओमध्ये ड्यूक 390, RC 390 आणि अॅडव्हेंचर 390 या बाइक्सचा समावेश आहे.
पावर-टॉर्कमध्ये किरकोळ घट अपेक्षित
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंजिन क्षमता कमी झाल्याने सध्याच्या 400cc मॉडेल्सच्या तुलनेत पावर आणि टॉर्कमध्ये थोडी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, डिझाइन, फीचर्स, चेसिस, तसेच राइडिंग डायनॅमिक्समध्ये फारसे बदल होणार नाहीत, असा अंदाज आहे.
ट्रायम्फची सर्वात किफायतशीर रेंज
सध्या ट्रायम्फची 400cc मोटरसायकल रेंज ही ब्रँडची सर्वात स्वस्त मानली जाते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या बाइक्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 350cc पेक्षा कमी क्षमतेचे मॉडेल्स आल्यास, ट्रायम्फची ग्राहकांपर्यंत पोहोच आणखी वाढण्याची शक्यता आहे.
बाजारातील चित्र बदलणार?
ट्रायम्फचा मजबूत इतिहास आणि ब्रँड ओळख रॉयल एनफील्डसारखीच ठाम आहे. जर कंपनी किफायतशीर दरात 350cc पेक्षा कमी इंजिनची मोटरसायकल लॉन्च करते, तर येत्या काळात या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी वाढेल. परिणामी, भारतीय मिड-कॅपेसिटी मोटरसायकल बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.