आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:34 IST2026-01-01T11:33:15+5:302026-01-01T11:34:11+5:30
Bharat Taxi Launch: १ जानेवारी २०२६ पासून दिल्लीत सरकारी पाठबळ असलेली 'भारत टॅक्सी' कॅब सर्व्हिस सुरू झाली आहे. ओला-उबरच्या मनमानीला लगाम लावणारी ही सेवा नेमकी काय आहे? जाणून घ्या भाडे आणि वैशिष्ट्ये.

आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीच्या रस्त्यांवर एक मोठी क्रांती होत आहे. ओला आणि उबरसारख्या खासगी कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारचे पाठबळ असलेली 'भारत टॅक्सी' ही कॅब सेवा अधिकृतपणे लाँच करण्यात आली आहे. वाढलेले भाडे, सर्ज प्रायसिंग आणि राइड कॅन्सलेशनमुळे त्रस्त असलेल्या दिल्लीकरांसाठी हे नवीन वर्षाचे मोठे 'सरप्राईज' ठरले आहे.
ही सेवा केवळ एक अॅप नसून, ती सहकारी तत्त्वावर चालवली जाणारी जगातील सर्वात मोठी ड्रायव्हर-ओन्ड यंत्रणा म्हणून समोर येत आहे. 'सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड'द्वारे चालवल्या जाणाऱ्या या मॉडेलमध्ये ड्रायव्हरच मालक आहेत.
प्रवाशांना मिळणारे फायदे:
नो सर्ज प्रायसिंग : पाऊस असो, गर्दीची वेळ असो किंवा सण, भारत टॅक्सीमध्ये भाडे वाढणार नाही.
पारदर्शक भाडे दर: ४ किमी पर्यंत किमान ३० रुपये, त्यानंतर पुढील अंतरासाठी निश्चित दर असतील.
सुरक्षितता: ही सेवा थेट दिल्ली पोलिसांशी जोडलेली असून रियल-टाइम ट्रॅकिंग आणि एम-पिन सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये यात आहेत.
बहुपर्यायी सेवा: एकाच अॅपवर ऑटो, बाईक टॅक्सी आणि कार (AC, Premium, XL) उपलब्ध असतील.
ओला-उबरमध्ये ड्रायव्हर्सना २० ते ३० टक्के कमिशन द्यावे लागते, मात्र भारत टॅक्सीमध्ये सुरुवातीला 'झिरो कमिशन' मॉडेल असेल. ड्रायव्हर्सना त्यांच्या कमाईचा ८० ते १०० टक्के हिस्सा थेट मिळेल. यामुळे दिल्लीत लाँचपूर्वीच तब्बल ५६,००० ड्रायव्हर्सनी या प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. भारत टॅक्सीचे अॅप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. प्रवाशांसाठी 'Bharat Taxi' आणि ड्रायव्हर्ससाठी 'Bharat Taxi Driver' असे दोन स्वतंत्र अॅप्स आहेत.