भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 18:08 IST2024-10-17T18:08:18+5:302024-10-17T18:08:52+5:30
Flying Taxi Service : फ्लाइंग टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे.

भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
Flying Taxi Service : बंगळुरु : कर्नाटकातील बंगळुरू शहर हे आयटी हब म्हणून ओळखले जाते. तसेच, या शहरात वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. मात्र, आता या वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता शहरात फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस सुरू होणार असून, त्यामुळे तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सरला एव्हिएशन आणि बंगलुरु इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL) संयुक्तपणे शहरात इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी सुरू करणार आहेत. ही फ्लाइंग टॅक्सी शहरातील प्रमुख ठिकाणं आणि विमानतळादरम्यान चालविली जाऊ शकते. ही फ्लाइंग टॅक्सी सुरू झाल्यास लोकांचा प्रवासातील बराच वेळ वाचू शकेल, असे म्हटले जात आहे.
रिपोर्टनुसार, या पार्टनरशिप अंतर्गत अॅडव्हान्स एअर मोबिलिटी सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित केले आहे. या फ्लाइंग टॅक्सी केवळ हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत उडणार नाही, तर प्रदूषणही करणार नाहीत. फ्लाइंग टॅक्सी जलद आणि पर्यावरणपूरक बनवण्यावरही कंपनीचा भर असणार आहे.
फ्लाइंग टॅक्सीसाठी किती असेल भाडे?
फ्लाइंग टॅक्सीने प्रवास केल्यास बराच वेळ वाचणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने इंदिरानगर ते विमानतळापर्यंत प्रवास केला तर त्याला रस्त्यानं जवळपास दीड तास लागतात. फ्लाइंग टॅक्सीने हाच प्रवास केल्यास फक्त ५ मिनिटांत पूर्ण करता येईल. रिपोर्ट्सनुसार, जर ही फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस सुरू झाली तर जवळपास २० मिनिटांच्या प्रवासासाठी प्रति व्यक्ती १७०० रुपये खर्च येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिससाठी किती वेळ लागेल?
फ्लाइंग टॅक्सीचा हा प्रोजेक्ट अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या फ्लाइंग टॅक्सीचा प्रोटोटाइप अजून बनवायचा आहे. तसेच, नियामक मान्यता मिळण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. BIAL च्या मते, ही फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस बंगळुरूमध्ये सुरू होण्यासाठी जवळपास दोन ते तीन वर्षे लागू शकतात.