खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर; विम्यामध्ये आणखी एक प्रिमिअम वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 12:44 IST2021-01-19T12:42:59+5:302021-01-19T12:44:04+5:30
Traffic rule violation premium in Insurance, Road Safety Month News: या प्रस्तावावर संबंधितांकडून 1 फेब्रुवारीपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. हा प्रिमिअम वाहनाच्या भविष्याशी संबंधित असणार आहे नवीन वाहनासाठी हा प्रमिअम शून्य असणार आहे.

खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर; विम्यामध्ये आणखी एक प्रिमिअम वाढणार
विमा नियामक प्राधिकरण इरडा (IRDAI) च्या एका समितीने वाहन चालकांची डोकेदुखी वाढविणारा आणि खिशावर परिणाम करणारा प्रस्ताव दिला आहे. स्वत:च्या वाहनाची दुखापतीची भरपाई, तिसऱ्या पक्षाच्या नुकसानीच्या भरपाईबरोबरच वाहतुकीचे नियम उल्लंघन प्रिमिअम आकारण्याचा हा प्रस्ताव आहे. हा विमा स्वत: आणि तिसऱ्या पक्षाला झालेल्या नुकसानीच्या विम्यासोबत आकारला जाणार आहे. याचाच अर्थ विम्याची रक्कम वाढणार आहे.
समितीने मोटर विम्यासाठी आणखी एक पाचवा नियम जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. यानुसार हा वाहतुकीचे नियम उल्लंघन प्रिमिअम जोडला जाणार आहे. हा प्रमिअम सध्याच्या उपलब्ध विम्यातील तरतुदींपेक्षा वेगळा ठेवण्यास सांगितले आहे.
या प्रस्तावावर संबंधितांकडून 1 फेब्रुवारीपर्यंत सूचना मागविण्यात आल्या आहेत. हा प्रिमिअम वाहनाच्या भविष्याशी संबंधित असणार आहे नवीन वाहनासाठी हा प्रमिअम शून्य असणार आहे. हा प्रिमिअम दारू पिऊन गाडी चालविणे ते चुकीच्या जागी पार्क करणे आदी विविध गंभीर गुन्ह्यांनुसार घेतला जाणार आहे. याचबरोबर वाहतुकीचे कोणते कोणते नियम मोडले याच्या निघालेल्या पावत्यांची माहिती विमा कंपन्यांना दिली जाणार आहे.
इन्शुरन्सचे प्रकार कोणते?
थर्ड पार्टी इन्शुरन्स
मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीर आहे. नावावरूनच स्पष्ट होते. हा विमा तिसऱ्या पक्षाशी संबंधीत आहे. पहिला पक्ष म्हणजे विमा विकत घेणारा, दुसरा पक्ष विमा कंपनी आणि तिसरा म्हणजे आपल्यामुळे ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे असा व्यक्ती. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये या तिसऱ्या व्यक्तीलाच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला काहीही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच तिसऱ्या पक्षाचा मृत्यू किंवा गंभार दुखापत झाल्यास त्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स
या प्रकारच्या इन्शुरन्समध्ये वाहनाला अपघात झाल्यास विमा घेणाऱ्या व्यक्तीसह तिरऱ्या पक्षाचे नुकसानही कव्हर होते. जर समोरचा व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास त्याचाही खर्च केला जातो. तसेच वाहनाचेही नुकसान मिळते. या विमा प्रकारामध्ये अपघात, आग, चोरी, नैसर्गिक आपत्ती किंवा दहशतवादामध्ये वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते. या प्रकारामध्ये वाहनाचे नुकसान प्लॅस्टिक, पत्रा याच्या वर्गीकरनानुसार दिले जाते. तसेच डेप्रिसिएशन वाहनाला झालेल्या वर्षानुसार ठरते.
झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स
या प्रकारच्या विमा पॉलिसी अंतर्गत वाहनाच्या नुकसानीची किंमत ठरविताना डेप्रिसिएशन म्हणजेच रक्कम कमी केली जात नाही. म्हणजेच अपघात झाल्यास विमा कंपनी नुकसानीची पूर्ण रक्कम वाहन मालकाला देते. मात्र, या प्रकारच्या इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्सपेक्षा 20 टक्क्यांपेक्षा महाग असतो.