सणांच्या काळातही वाहन उद्योगात मंदी कायम, सप्टेंबरमध्ये कारच्या विक्रीत घसरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 15:19 IST2019-10-11T15:18:22+5:302019-10-11T15:19:08+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून भारताची अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे.

सणांच्या काळातही वाहन उद्योगात मंदी कायम, सप्टेंबरमध्ये कारच्या विक्रीत घसरण
नवी दिल्लीः गेल्या दोन महिन्यांपासून भारताची अर्थव्यवस्था सुस्तावलेली आहे. मोदी सरकार या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वारंवार प्रयत्नशील आहे. यासाठी केंद्र सरकारनं कॉर्पोरेट टॅक्सपासून अनेक करांमध्ये कपात करण्याचे निर्णय घेतले आहेत. परंतु सरकारच्या या प्रयत्नानंतरही वाहन उद्योग क्षेत्रात मंदी कायम आहे. वाहन निर्मात्यांची संघटना असलेल्या सियामनं, सप्टेंबरमध्ये कारच्या विक्रीत पुन्हा एकदा कपात झाल्याचं सांगितलं आहे. सियामच्या आकड्यांनुसार, प्रवासी वाहनांच्या विक्रीत 23.69 टक्क्यांची घट झाली आहे. तर व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 62.11 टक्के कपात नोंदवली गेली आहे.
काय सांगतात आकडे
सियामच्या आकड्यांनुसार सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहनांच्या उत्पादनात जवळपास 19 टक्क्यांनी कपात आली आहे. तसेच घरगुती विक्रीतही 23.69 टक्के घट नोंदवली गेली आहे. सप्टेंबरमध्ये जवळपास 2,23,317 प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. तर 2,79,644 प्रवासी वाहनांचं उत्पादन झालं आहे. सप्टेंबरमध्ये प्रवासी गाड्यांचं उत्पादन 1,80,779 युनिट राहिलं आहे. तर याच अवधीमधील गेल्या वर्षी 2,33,351 गाड्यांचं उत्पादन झालं होतं. त्याअंदाजे 22.53 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.
तसेच प्रवासी वाहनांच्या घरगुती विक्रीबाबत विचार केल्यास सप्टेंबर 2019मध्ये 1,31,281 गाड्यांची विक्री झाली आहे. तसेच गेल्या वर्षी याच कालावधीत 1,97,124 कारची विक्री झाली आहे. म्हणजेच प्रवासी गाड्यांच्या घरगुती विक्रीत 33 टक्के घट नोंदवली गेली आहे. यूटिलिटी वाहनांच्या सप्टेंबरमधील उत्पादनाचा विचार केल्यास 2.45 टक्क्यांची घट नोंदवून 87 हजार 127 झाली आहे. तसेच या अवधीमध्ये गेल्या वर्षी 89 हजार 319 वाहनांचं उत्पादन झालं आहे.