नव्या मोटार कायद्याविरोधात 51 संघटनांचा चक्का जाम; दिल्लीमध्ये शाळांना सुटी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 08:57 AM2019-09-19T08:57:06+5:302019-09-19T08:57:52+5:30

1 सप्टेंबरपासून नवा कायदा लागू झाल्यानंतर दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये आकारलेला दंड 6 लाखांवर गेला होता.

51 unions of Delhi called 24 hour strike against new motor law; Holiday declared for schools | नव्या मोटार कायद्याविरोधात 51 संघटनांचा चक्का जाम; दिल्लीमध्ये शाळांना सुटी जाहीर

नव्या मोटार कायद्याविरोधात 51 संघटनांचा चक्का जाम; दिल्लीमध्ये शाळांना सुटी जाहीर

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीमध्ये 51 वाहतूक संघटनांनी बंद पुकारला आहे. यामुळे प्रशासनाला शाळांना सुटी जाहीर करावी लागली आहे. 1 सप्टेंबरपासून नवा कायदा लागू झाल्यानंतर दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये आकारलेला दंड 6 लाखांवर गेला होता. यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी पसरली आहे. याशिवाय़ विमा रक्कम, आरएफआयडी टॅगची सक्ती यासह अन्य मुद्दे आहेत. 


यामुळे दिल्लीतील वाहतुकीवर परिणाम होणार असून 25 हजार ट्रक, 35 हजार रिक्षा, 50 हजाराच्या आसपास टॅक्सी आणि कॅब सोबत स्कूलबस-व्हॅनही बंद राहणार आहेत. यामुळे लोकांना येण्याजाण्यास समस्या निर्माण होणार आहेत. युनायटेड फ्रंट ऑफ ट्रांसपोर्ट असोसिएशनचे महासचिव शामलाल गोला यांनी सांगितले की, बंदमध्ये दिल्लीसोबत एनसीआरचे वाहनही सहभागी होणार आहेत. जर सरकारने मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर दोन दिवसांत बैठक घेऊन हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणार आहोत. 


यामुळे वाहतूक संघटनांनी बुधवारी रात्रीपासून 24 तासांचा सांकेतिक बंद पुकारला आहे. यामुळे शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमेवर उत्तरप्रदेशच्या गाझियाबादमधील एका शाळेने पालकांना मॅसेज करून शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे कळविले आहे. यानंतर सर्वच शाळांना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 


नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये जाचक दंड आकारण्यात आला आहे. नियम पाळण्याच्या सक्तीला विरोध नसून दंडाच्या रक्कमेला आहे. सध्या देशात मंदीचे ढग आहेत. अशावेळी काही लाखात दंडाची रक्कम आकारणे कितपत योग्य राहिल. याशिवाय विम्याच्या रकमेतही मोठी वाढ केली आहे. यामध्ये वाहन मालकाचीही बाजू मांडायला हवी होती. अशा मागण्या आम्ही केंद्राच्या अधिकाऱ्यांना भेटून केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

ओला-उबरची वाहतूक थांबविली
संपकऱ्यांनी ओला उबरचीही वाहतूक थांबविली आहे. यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. याशिवाय रस्त्यावर उतरलेल्या रिक्षांनाही जबरदस्तीने थांबविण्यात येत आहे. 

वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी नवीन मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम दहापटीने वाढविण्यात आली आहे. तसेच नवे वाहतुकीचे नियम लागू झाल्यानंतर नवनवीन किस्से समोर येत आहेत. त्यातच आता सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार कायद्याचा गुजरातमधील नागरिकांनी डोक्यावर पातेले घालून निषेध व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वाहतुकीच्या जाचक दंडाचा असा नोंदविला निषेध; हेल्मेट ऐवजी घातले पातेले

 

Web Title: 51 unions of Delhi called 24 hour strike against new motor law; Holiday declared for schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.