चिंताजनक ! औरंगाबाद शहरात ४ हजार श्वानांना त्वचारोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:51 PM2019-11-06T18:51:41+5:302019-11-06T18:54:34+5:30

भटक्या श्वानांमध्ये झपाट्याने वाढतोय संसर्गजन्य आजार 

Worrying! In Aurangabad city 4,000 dogs suffers from skin diseases | चिंताजनक ! औरंगाबाद शहरात ४ हजार श्वानांना त्वचारोग

चिंताजनक ! औरंगाबाद शहरात ४ हजार श्वानांना त्वचारोग

googlenewsNext
ठळक मुद्देपाळीव श्वानांची काळजी घेतली जाते; पण भटक्या श्वानांना कोणीच वाली नसतो.मागील तीन वर्षांत शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली

औरंगाबाद : शहरात भटकणाऱ्या सुमारे ४ हजार श्वानांना संसर्गजन्य त्वचारोग जडला आहे. त्यामुळे त्वचारोग झालेल्या श्वानांची संख्या झपाट्याने वाढत आहे. खरूज झाल्यामुळे त्रासलेले श्वान हल्लाही करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, उघड्यावर टाकले जाणारे अन्नपदार्थ, मांस आणि लांबलेला पावसाळा याचा मोठा फटका भटक्या श्वानांना बसला आहे. त्यातून श्वानांच्या शरीरावर पिसवा, गोचीड आणि खरूजची लागण होत आहे. त्यामुळे त्यांच्या अंगावरील केस गळून पडत आहेत. त्वचा लालसर व कोरडी पडल्यामुळे अंग घासणारे श्वान जागोजागी दिसत आहेत. त्यात मागील तीन वर्षांत शहरात वाढलेली श्वानांची संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. 

मनपाच्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०१६ दरम्यान शहरात २३ ते २५ हजार श्वानांची संख्या होती. मात्र, मागील तीन वर्षांत निर्बीजीकरण बंद असल्याने श्वानांची संख्या झपाट्याने वाढून आजघडीला ४० हजारांवर गेली आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, त्यातील १० टक्के म्हणजेच ४ हजारांपेक्षा अधिक श्वानांना त्वचारोग जडला आहे. ही बाब, गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण, खाजून खाजून त्रासलेले श्वान पिसाळत असून, हल्लाही करू शकतात. अशा घटना शहरात घडल्या आहेत व घडत आहेत. औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या मते शहरात आजघडीला सुमारे ६० हजार श्वान असून, त्यातील १० ते १५ टक्के श्वान खरूजने त्रस्त आहेत. पाळीव श्वानांची काळजी घेतली जाते; पण भटक्या श्वानांना कोणीच वाली नसतो. मागील तीन वर्षांत शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या व शहरात जागोजागी कचऱ्याचे निर्माण झालेले ढीग, याच ढिगावर कुजलेले अन्न खाऊन भटके श्वान जगतात, तसेच  मांस विक्रे तेही लपूनछपून उघड्यावर अवशेष फेकतात, तसेच यंदा सततचा पाऊस, घाण खाणे व उकीरड्यावर बसणे, यामुळे श्वानांना त्वचेचे आजार झाले आहेत. खाजूनखाजून बेजार झालेले हे श्वान आडोशाला किंवा जागा मिळेल तिथे पडून असतात. या श्वानांवर लवकरच उपचार व्हावेत, अशी मागणी असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे. 

आॅक्टोबरमध्ये ४७२ श्वानांचे निर्बीजीकरण
 सर्वप्रथम श्वानांची वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बीजीकरण करणे आवश्यक आहे. खाजगी संस्थेतर्फे श्वानांचे निर्बीजीकरण करणे सुरू केले आहे. आॅक्टोबर महिन्यात ४७२ श्वानांचे, तर वर्षभरात २१२६ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. खरजुल्या कुत्र्यांची माहिती नागरिकांनी ०२४०-२३०१३५४ या नंबरवर कळवावी. मनपाचे श्वान पकडणारे पथक येऊन त्या श्वानांना घेऊन जातील व त्यांच्यावर उपचार करतील. ज्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही. त्यांना देखभालीखाली ठेवून नंतर तज्ज्ञांच्या निर्णयानुसार त्या श्वानांना दयामरण दिले जात आहे. मागील वर्षभरात १३ श्वानांना इंजेक्शन देऊन दयामरण दिले आहे. 
-डॉ. बी. एस. नाईकवाडे, संचालक, प्राणिसंग्रहालय मनपा

उपचारासाठी हौद तयार करावा
भटक्या कुत्र्यांमध्ये खरूजचे प्रमाण वाढले आहे. संसर्गजन्य असल्याने त्याची लागण एका श्वानाकडून दुसऱ्या श्वानाला होत आहे. श्वानांची संख्या लक्षात घेता प्रत्येकाला पकडून त्यांच्यावर उपचार करणे कठीण आहे. यासाठी महानगरपालिकेने हौद तयार करून त्यात औषधी टाकावी व त्यात श्वानांना एकसाथ सोडून द्यावे. त्या हौदातून बाहेर निघेपर्यंत पाण्याद्वारे औषधी श्वानांच्या अंगावर लागेल व अनेक श्वान बरे होतील, तसेच श्वानांवर निर्बीजीकरण करणे, उपचार करणे व निगराणीखाली ठेवण्यासाठी महानगरपालिकेने मध्यवर्ती जकातनाका येथील प्राण्यांच्या दवाखान्याला लागून पिंजरे तयार केले आहेत. या केंद्राचा विस्तार लवकरात लवकर करावा व श्वानांवर उपचार करावेत. 
 -बेरल सांचीज,  अध्यक्षा, औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशन 
 

Web Title: Worrying! In Aurangabad city 4,000 dogs suffers from skin diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.