निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:56 AM2019-09-21T11:56:07+5:302019-09-21T12:05:57+5:30

पंतप्रधानांनी माहिती घेऊन बोलावे

When elections come, the prime minister is responsible for saying anything: Sharad Pawar | निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान : शरद पवार

निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान : शरद पवार

googlenewsNext
ठळक मुद्देकाबाडकष्ट करून शेती पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला हमी द्या.शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये सत्ता उलथवण्याची ताकद

औरंगाबाद : ‘पंतप्रधानपद हे महत्त्वाचे पद. पदाची प्रतिष्ठा ठेवा. त्या पदावर असलेल्या माणसाने तरी जरा नीट माहिती घेऊन बोललं पाहिजे. मी जे बोललोच नाही, त्यावरून माझ्यावर टीका करणे हे पंतप्रधानांना शोभत नाही’ असा टोला शरद पवार यांनी लगावला.

‘पाकिस्तानमध्ये सत्ता असलेली मंडळी व सैन्य आपल्या हातातून सत्ता जाऊ नये यासाठी सतत भारताविरुद्ध बोलत असतात, असे मी बोललो होतो. ही काय पाकिस्तानची स्तुती झाली, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. निवडणुका आल्या की, काहीही बोलण्यात पंतप्रधान कर्तृत्ववान आहेत, याबद्दल शंका नाही, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले. महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या गड-किल्ल्यांवर बार संस्कृती वाढविण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

शेतकऱ्यांबद्दलची चिंता 
काबाडकष्ट करून शेती पिकवणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला हमी द्या. त्याच्या डोक्यावरचे कर्ज कमी करा. आज हे होताना दिसत नाही, म्हणून टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करणे गुन्हा असतानाही तो स्वत:ला संपवून घेतोय; पण याच शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आहे, हे लक्षात घ्या, असा इशारा पवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. 

जयाजी सूर्यवंशी यांनी पोलीस अडवत असतानाही शरद पवार यांना शेतकऱ्यांचा आसूड दिला. हा आसूड त्यांनी उंचावताच टाळ्या पडल्या. मंचावर माजी आमदार किशोर पाटील, चंद्रकांत घोडके, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, सुधाकर सोनवणे, छाया जंगले, वीणा खरे, मेहराज पटेल, रंगनाथ काळे, विजय साळवे, अभिषेक देशमुख, अभय चिकटगावकर,   सोहेल कादरी, दत्ता भांगे, प्रतिभा वैद्य, एकनाथ गवळी, रावसाहेब दारकोंडे आदींची उपस्थिती होती.

वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर  हे भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र, आज या कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीने व शेरशायरीयुक्त भाषणामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार, हे स्पष्ट  झाले. जालना रोडवरील हॉटेलमध्ये रात्री पवार यांनी मुक्काम केला. यादरम्यान जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे यांनी पवार यांची भेट घेऊन राजकीय चर्चा केली.आमदार सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब पा. चिकटगावकर, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कदीर मौलाना, विलास चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर नीळ, माजी आमदार संजय वाघचौरे यांची यावेळी भाषणे झाली. प्रदीप सोळुंके यांनी सूत्रसंचालन केले.

क्षणचित्रे : 
‘साहेब, कर्तृत्व बोलते तुमचे, दिशा दाखवली तुम्ही, चार फितुर जाहले तरी लाखो सोबती आम्ही,’ अशी वाक्ये व्यासपीठाच्या बॅनरवर झळकत होती. सोबतीला शरद पवारांचाच एकट्याचा फोटो होता. हातानेच इशारा करीत शरद पवार व्यासपीठावरील अनावश्यक गर्दी नियंत्रित करीत होते. दिलेल्या निवेदनांवर व वर्तमानपत्रांवरील बातम्यांवर त्यांची नजर जात होती. ‘एकच साहेब... पवार साहेब’, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो’ अशा घोषणा दुमदुमत होत्या. 

Web Title: When elections come, the prime minister is responsible for saying anything: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.