Three lacks robbery by fake accident, four arrested in Aurangabad | अपघाताचा बहाणा करून व्यापाऱ्याचे तीन लाख लुटले, चौघे अटकेत
अपघाताचा बहाणा करून व्यापाऱ्याचे तीन लाख लुटले, चौघे अटकेत

ठळक मुद्देदोन दुचाकीवरील चार जण अचानक त्यांच्यासमोर दुचाकी आडवी लावून थांबले. पोटाला चाकू लावून धमकावत कारमधील तीन लाखाची बॅग हिसकावून ते पळून गेले.

औरंगाबाद : माजी नोकराने दिलेल्या माहितीच्या आधारे चार जणांनी  सिरॅमिक टाईल्सच्या व्यापाऱ्याच्य कारला आपल्या दुचाकीचा धक्का दिल्यानंतर नुकसानभरपाईच्या नावाखाली चाकूचा धाक दाखवून तीन लाखाची रोकड लुटणाऱ्या चार जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून लुटलेल्या रक्कमेपैकी १ लाख ७९ हजार रुपयांची रोकड, दोन मोटारसायकल, आणि मोबाईल असा सुमारे तीन लाखाचा ऐवज हस्तगत केला,अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ.राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पंकज लोटन पाटील(वय २१), प्रेम उर्फ निखील अशोक साळवे (वय २० रा. कैलासनगर), अरविंद सुभाष सपाटे (२८, रा.एन-६, सिडको) आणि कृृष्णा उर्फ किशोर उत्तमराव लोखंडे (वय २५,रा. कैलासानगर) अशी अटकेतील लुटारूंची नावे आहेत. अधिक माहिती देताना उपायुक्त डॉ. खाडे म्हणाले की, पिसादेवी येथील रहिवासी कृष्णा हरजीत चांबरिया यांचे कामगार चौक सिडको एन-४ येथे सिरॅमिक टाईल्सचे दुकान आहे. तीन ते चार दिवस व्यवसायातून जमा होणारी रक्कम ते त्यांच्या भागीदारांकडे घेऊन जातात. हा त्यांचा नित्याचाच उपक्रम आहे. नेहमीप्रमाणे १४ आॅगस्टरोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते दुकानात जमा झालेले तीन लाख रुपये बॅगमध्ये ठेवून कारने घरी जाऊ लागले. हनुमानचौकाजवळील एसबीआय आणि अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएमसमोर ते असताना त्यांच्या कारला एका बाजून दुचाकीस्वाराने धडक दिली. यानंतर ते दोन दुचाकीवरील चार जण अचानक त्यांच्यासमोर दुचाकी आडवी लावून थांबले. दोनजण कारमध्ये बसले आणि तुझ्या कारने आमच्या दुचाकीचे नुकसान केले, आम्हाला नुकसानभरपाई दे, आम्ही म्हणतो त्या गॅरेजवर चाल,असे म्हणाले. आणि कार पुढे घेण्यास सांगितले.

यावेळी कृष्णा यांनी माझ्या ओळखीच्या गॅरेजवर जाऊ असे म्हणाले असता आरोपीने त्यांना नकार दिला. त्यांनी पुढे काही अंतरावर नेल्या नंतर कार थांबायला लावून कृष्णा यांच्या पोटाला चाकू लावून धमकावत कारमधील तीन लाखाची बॅग हिसकावून ते पळून गेले. याविषयी तक्रार प्राप्त होताच सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, विनायक कापसे, रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे,  प्रवीण मुळे, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, नितेश जाधव, दिपक जाधव, गणेश डोईफोडे आणि माया उगले यांनी झटपट कारवाई करीत आरोपींना अवघ्या सात तासात अटक केली. 

Web Title: Three lacks robbery by fake accident, four arrested in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.