Thieves broke into a house on Jatwada Road and stole Rs 5 lakh | जटवाडा रोडवर घरफोडी करून चोरट्यांनी पळविला तब्बल पाच लाखांचा ऐवज

जटवाडा रोडवर घरफोडी करून चोरट्यांनी पळविला तब्बल पाच लाखांचा ऐवज

ठळक मुद्दे राधास्वामी कॉलनीतील घटना :श्वान घराजवळच घुटमळला

औरंगाबाद : जटवाडा रोडवरील राधास्वामी कॉलनीत घरात झोपलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी ८ तोळ्यांचे सोन्याचे  दागिने, १६७ ग्रॅम चांदीचे अलंकार आणि रोख ८५ हजार रुपये लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याविषयी हर्सूल  ठाण्यात तक्रार नोंदविली.

सुनील धुमसिंग चव्हाण यांचे राधास्वामी कॉलनीत  दोन भाऊ, बहीण आणि आई-वडील हे संयुक्त कुटुंबात राहतात. नेहमीप्रमाणे २१ आॅक्टोबर रोजी रात्री १०  वाजता सर्वांनी एकत्र जेवण करून सुनील हे खालच्या मजल्यावर तर त्यांचे अन्य  नातेवाईक वरच्या मजल्यावर झोपले. तत्पूर्वी सुनील यांनी घराचा दरवाजा आतून लावला होता. रात्री चोरट्यांनी मुख्य दाराचा आतून लावलेला कोंडा तोडून प्रवेश केला. तळमजल्यावरील किचनमध्ये असलेले लोखंडी कपाट उचकटून चोरट्यांनी पार्वतीबाई चव्हाण यांचे अडीच तोळ्यांचे दागिने, ३० ग्रॅम चांदीचे पैंजण, सुनील यांची १ तोळ्याची अंगठी, गळ्यातील चेन, १६ ग्रॅमचे चांदीचे पैंजण, अनिल यांची ६ ग्रॅमची अंगठी, जगदीश बळीराम राठोड यांचे साडेतीन तोळ्यांचे नेकलेस, कानातील टॉप्स, चांदीचे पैंजण आणि जोडवे तसेच सुनीता चव्हाण यांची १ तोळ्याची सोन्याची पोत, १६ ग्रॅम चांदीचे पैंजण असा एकूण ८ तोळे सोन्याचे दागिने, १६७ ग्रॅम चांदीच्या वस्तू आणि रोख ८५ हजार रुपये रोख  चोरून नेले.  

पहाटे ५ वाजेच्या सुमारास सुनील यांची पत्नी झोपेतून उठली तेव्हा घरात चोरी झाल्याचे त्यांना दिसले. यानंतर त्यांनी घरातील सर्व नातेवाईकांना झोपेतून  उठवले. या घटनेची माहिती हर्सूल पोलिसांना कळविण्यात आली.  पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक नितीन कामे, मनोज शिंदे, उपनिरीक्षक पी. एस. भागिले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

श्वान घराजवळच घुटमळला...
घटना कळताच हर्सूल पोलिसांनी तातडीने अंगुली मुद्रा पथकाला आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. चोरट्यांनी दागिने काढून घेऊन दागिन्यांचे रिकामे बॉक्स एका कपड्यात बांधून चव्हाण यांच्या घरामागे फेकले होते. यामुळे चव्हाण यांच्या घरातून निघालेला श्वान बॉक्स टाकलेल्या ठिकाणापर्यंत गेला आणि घुटमळला.

Web Title: Thieves broke into a house on Jatwada Road and stole Rs 5 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.