पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाची खंबीर साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 02:03 PM2019-08-16T14:03:19+5:302019-08-16T14:05:34+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मदतीस इच्छुक असणारे तात्काळ प्रतिसाद देतात.

Social media useful to help flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाची खंबीर साथ

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मीडियाची खंबीर साथ

googlenewsNext
ठळक मुद्देयुवकांनी सोशल मीडियातून केले मदतीचे आवाहनग्रुपमधील सर्वांना आणि परिचितांना सोशल मीडियातून दिला संदेश

औरंगाबाद : कोल्हापूर-सांगलीत उद्भवलेल्या भयंकर पूरपरिस्थितीत अडकलेल्या हजारो नागरिकांना मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी युवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसत असून, त्यांना मदत गोळा करून देण्यात आणि ती योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाची खंबीर साथ लाभत आहे. शहरातील ‘आव्हान युथ फाऊंडेशन’या युवकांच्या ग्रुपने या माध्यमातून भरघोस मदत रवाना केली आहे.

सांगली जिल्ह्यात ग्रामीण भागात मदतकार्य करणाऱ्या राजू केंद्रेला पूरग्रस्तांसाठी काही अत्यावश्यक मदत हवी होती. त्याने सोशल मीडियातून मदतीचे आवाहन केले. हा संदेश शहरातील ‘आव्हान युथ फाऊंडेशन’ या सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांच्या ग्रुपला मिळाला. ग्रुपमधील युवक छोटे-मोठे काम करत शिक्षण घेतात आणि काही सामाजिक उपक्रम राबवितात. यातील ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या सुनील नायरने आवश्यक मदतीची नोंद करून एक यादी बनवून संदेश तयार केला. हा संदेश ग्रुपमधील सर्वांना आणि परिचितांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवून मदतीचे आवाहन केले. लागलीच त्यांना शहरातून मदतीसाठी संदेश येऊ लागले. कोणी सामान आणून दिले तर कोणी मदतीसाठी रोख रक्कम पाठविली. आलेल्या सामानाचे वर्गीकरण करून आवश्यक साहित्याची एका कुटुंबासाठी कीट तयार करण्यात आली. जवळपास ४०० कुटुंबांसाठी अशा कीट तयार करण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यातील आरे या खेड्यात मदतकार्य करणाऱ्या सचिन गवळी याने येथील ३०० कुटुंबांसाठी कपड्यांची मदत पाठविण्याचे आवाहन सोशल मीडियातून केले. याला प्रतिसाद देत ‘आव्हान युथ फाऊंडेशन’ने शहरातील दानशूरांना सोशल मीडियातून संपर्क  केला. दोन दिवसांमध्ये त्यांच्याकडे महिला, पुरुष आणि लहान मुलांसाठी आवश्यक अंतर्वस्त्रे आणि इतर कपडे मोठ्या प्रमाणात जमा झाली. कोल्हापूर आणि सांगलीला मदत शहरातून पाठवताना होणारा खर्चसुद्धा मोठा आहे, यासाठी ट्रॅव्हल व्यावसायिक सुनील दांडगे हे मोफत व्यवस्था करीत आहेत.

योग्य ठिकाणी मदत पोहोचणे आवश्यक 
मदतकार्यात समन्वयक असलेला सुनील नायर सांगतो, मदत करण्यासाठी खूप जण इच्छुक असतात. मात्र, ती कशी आणि नेमकी कुठे द्यायची याची त्यांना माहिती नसते. सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मदतीस इच्छुक असणारे तात्काळ प्रतिसाद देतात. यात युवकांची संख्या जास्त आहे. संदेश पाहून सिंगापूर आणि देशातील इतर राज्यांतील काही मित्रांनीसुद्धा आर्थिक मदत पाठविली. विशेष म्हणजे दानशूरांना त्यांची मदत कुठे आणि कोणाला पोहोचली याची माहिती, फोटो आम्ही पाठवत असतो. यामुळे त्यांनासुद्धा मदत योग्य ठिकाणी पोहोचल्याचे समाधान मिळते.

Web Title: Social media useful to help flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.