धक्कादायक ! कारागृहात कैद्याला डॉक्टर ६ फुटांवरून तपासतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:46 PM2020-07-09T19:46:51+5:302020-07-09T19:54:04+5:30

कारागृहातील कैदी आणि तेथील अधिकारी, कर्मचारी यांना प्राथमिक उपचाराची सोय व्हावी याकरिता कारागृहामध्ये दवाखाना आहे.

Shocking! In the prison, the doctor examines the prisoner from 6 feet | धक्कादायक ! कारागृहात कैद्याला डॉक्टर ६ फुटांवरून तपासतात

धक्कादायक ! कारागृहात कैद्याला डॉक्टर ६ फुटांवरून तपासतात

googlenewsNext
ठळक मुद्दे जेल अधीक्षकांची तक्रार कैद्याला वेळेत घाटीत न पाठविल्याने मृत्यू 

- बापू सोळुंके

औरंगाबाद : हर्सूल मध्यवर्ती कारागृहात नियुक्त डॉक्टर ५ ते ६  फुटांवर कैदी रुग्णाला उभे करून त्यांची तपासणी करतात. कैद्यांना हात न लावता कर्मचाऱ्यामार्फत ईसीजी काढणे आणि अन्य औषधोपचार करतात. एवढेच नव्हे, तर एका कैदी रुग्णाने तक्रार करूनही त्याला वेळेत घाटीत न पाठविल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार कारागृह प्रशासनाने आरोग्य विभागाकडे पाठविल्याचे समोर आले. 

हर्सूल मध्यवर्ती कारागृहात दीड हजाराहून अधिक कैदी आहेत. कारागृहातील कैदी आणि तेथील अधिकारी, कर्मचारी यांना प्राथमिक उपचाराची सोय व्हावी याकरिता कारागृहामध्ये दवाखाना आहे. डॉ. जहागीरदार आणि डॉ. कुंडलिकर तेथे तैनात आहेत. कारागृहातील कैदी आजारी पडल्यास सर्वप्रथम कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना  बोलावण्यात येते.  त्यांच्यावर उपचार केले जातात. कैद्यांना विशेष उपचाराची गरज असेल तर त्यांना कारागृहामधून घाटी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकारी देतात. कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी जहागीरदार हे रुग्ण कैद्यांना ५  ते ६ फूट अंतरावर उभे राहण्यास सांगतात. स्टेथोस्कोपने त्यांची तपासणी करीत नाहीत. कैद्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे एका कैद्याला प्राणास मुकावे लागल्याची तक्रार प्रशासनाने आरोग्य विभाग आणि कारागृहाच्या वरिष्ठ कार्यालयास पाठविली आहे.

या तक्रारीत म्हटले की, २४ मे रोजी रात्री  कैदी सचिन गायकवाड याची प्रकृती ठीक नसल्याची तक्रार केल्यामुळे त्याला डॉ. जहागीरदार यांना दाखविण्यात आले. त्यावेळी जहागीरदार यांनी त्यांना दूर उभे करून विचारपूस केली. यानंतर त्यास बराकीत पाठवले. दोन तासांनंतर कैद्याला त्रास होत असल्यामुळे पुन्हा डॉक्टरांना दाखविण्यात आले. त्यावेळी त्याला  घाटीत नेण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी त्याला घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू झाला. डॉ. जहागीरदार यांनी कैद्याला वेळेत घाटीत पाठवले असते तर तो वाचला असता.

प्रशासन घेतेय काळजी 
तीन महिन्यांपासून शहरात कोरोनाची साथ बळावली आहे. कोरोनाने कारागृहामध्ये शिरकाव केला. एकाच वेळी २९ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. १४ कारागृहरक्षक आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कैद्यांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासन काळजी घेत असल्याचा दावा करण्यात आला होता. 

डॉक्टरांनी केला आरोपाचा इन्कार; कारागृह अधीक्षकच करतात आमचा छळ 
आरोग्य विभागात २५ वर्षांपासून रुग्णसेवा करतो. कारागृह अधीक्षकांचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत.  कैदी गायकवाडचा मृत्यू नैसर्गिक होता. आम्ही कैद्याच्या आरोग्याची मनापासून काळजी घेतो. कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव हे आम्हाला कैद्यासारखी वागणूक देतात. ते  आमचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत आहेत. याविषयी आरोग्य उपसंचालक आणि कारागृह उपमहानिरीक्षकांकडे तक्रारी केल्या आहेत. 

Web Title: Shocking! In the prison, the doctor examines the prisoner from 6 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.