Self-preparation and independent movement in BJP | भाजपची स्वबळाची तयारी अन् अपक्ष हालचाली
भाजपची स्वबळाची तयारी अन् अपक्ष हालचाली

- राम शिनगारे 

सध्या भाजप आणि शिवसेना या राज्यातील सत्ताधारी पक्षांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरू आहे. या इनकमिंगचा विचार करतानाच दोन्ही पक्षांची युती होणार असा दावा वरिष्ठ पातळीवर करण्यात येत असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र महाजनादेश यात्रा काढली. तर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून स्वतंत्र तयारी केली आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोरात असतानाच जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार यावर कोणीही भाष्य करीत नाही. शिवसेना छोटा भाऊ होण्यास तयार नाही आणि भाजप मोठा भाऊ झाल्याचे सांगायला विसरत नाही. राज्यस्तरावर या घटना घडत असतानाच औरंगाबाद भाजपमध्ये काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरू असल्याचे समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खासदारांचा पराभव झाला. हा पराभव कोणामुळे झाला हे सर्वश्रुत आहे. पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांना भाजपच्या काही नेत्यांनी दगा दिल्याचे जाहीर आरोप केले होते. हा पहिला अंक संपल्यानंतर विधानसभेच्या रूपाने दुसऱ्या अंकाची सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार असलेल्या संजय शिरसाट यांच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी संपर्क कार्यालय उघडले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला होता. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी राजू शिंदे यांनी पश्चिमची मागितलेली उमेदवारी आणि त्यांना केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या शुभेच्छा यातून योग्य तो संदेश देण्याचे काम भाजपने केले आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केलेली पाऊलवाट विजयाचा राष्ट्रीय महामार्ग बनेल, असे सांगितले. तर राज्यमंत्री अतुल सावे यांनी २०१४ च्या विधानसभेच्या वेळी घडलेली घटना सांगितली. तेव्हा आपणही अगोदरच संपर्क कार्यालय सुरू केले. पुढे सगळा रस्ता साफ झाला. पूर्व मतदारसंघही युतीच्या काळात शिवसेनेकडे होता. विधानसभा वेगवेगळ्या लढल्यामुळे अतुल सावे यांना तिकीट मिळाले. याचीच पुनरावृत्ती होण्याचे संकेत सावे यांच्या वक्तव्यातून निघतात. पश्चिम मतदारसंघातील कार्यकर्ते अनिल चोरडिया यांनी तर थेट युती तोडण्याची मागणीही याच कार्यक्रमातून केली. एक साधा कार्यकर्ता अशी मागणी थेट पक्षाच्या व्यासपीठावरून जाहीरपणे कशी करू शकतो. बरं ही मागणी झाल्यानंतर एकाही पदाधिकाऱ्याने चोरडियांची मागणी योग्य नाही, असे स्पष्ट केले नाही. यामुळे एकतर भाजपला स्वबळावर लढायचे आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनच संभाव्य उमेदवारांना बळ देण्याचे काम भाजप करीत आहे.

दुसरी बाजू म्हणजे, मागील काही वर्षांपासून राजू शिंदे यांना पश्चिममधून विधानसभा लढवायची आहे. २०१४ मध्येच त्यांना पक्षांची उमेदवारी नक्की होती. मात्र त्यांनी जालना लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचे रावसाहेब दानवे यांनी याच कार्यक्रमात सांगितले. त्यावरून त्यांना तिकीट मिळाले नसावे. यावेळी अनुकूल वातावरणाचा फायदा घेण्यासाठी भाजप काही निष्ठावंतांना युती झाल्यानंतर शिवसेनेला सुटलेल्या मतदारसंघात अपक्ष उभे करून निवडून आणले जाऊ शकते. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी कोणत्याही पक्षाची गरज निर्माण होऊ नये. आपल्या विचारांचे निवडून आलेले अपक्षच सोबत यावेत, यादृष्टीनेही चाचणी सुरू असल्याचे अनेक नेते खाजगीत सांगतात. मात्र उघडपणे बोलत नाहीत. हीच स्थिती इतरही मतदारसंघांत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची स्वबळाची तयारी आहे की अपक्ष उभा करण्याच्या हालचाली हे येत्या काही दिवसांतच दिसून येईल, हे नक्की.


Web Title: Self-preparation and independent movement in BJP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.