रोझ गार्डन चौथ्या दिवशीच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 06:32 PM2019-08-19T18:32:32+5:302019-08-19T18:34:46+5:30

मोफत प्रवेश महानगरपालिकेच्या अंगलट

Rose Garden closes on the fourth day | रोझ गार्डन चौथ्या दिवशीच बंद

रोझ गार्डन चौथ्या दिवशीच बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे४ दिवसांमध्ये पाच हजारांवर नागरिकांनी दिली भेट ३ एकर परिसरात १३ वेगवेगळ्या स्वरूपाची झाडे

औरंगाबाद : केंद्रीय पर्यटन विभागाने दिलेल्या निधीतून मजनू हिल येथील टेकडीवर रोझ गार्डन उभारण्यात आले आहे. तेरा प्रकारच्या वेगवेगळ्या गुलाबांच्या झाडांनी हे उद्यान विकसित करण्यात आले. स्वातंत्र्य दिनापासून नागरिकांसाठी उद्यान मोफत स्वरूपात खुले करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी १७७४ नागरिकांनी भेट दिली. उद्यानात उनाड तरुणांनी हैदोस घालण्यास सुरुवात केली असून, कुटुंबासह उद्यानात पाय ठेवणेही अवघड झाले होते. अखेर आज चौथ्या दिवशी मनपाने उद्यानाला कुलूप लावले.

पर्यटनाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरात दरवर्षी ३० लाखांहून अधिक पर्यटक येतात. पर्यटकांना शहरात ऐतिहासिक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी बरेच काही आहे. सायंकाळी निवांत क्षण घालविण्यासाठी एक सुंदर नेत्रदीपक असे रोझ गार्डनही असावे, अशी संकल्पना काही वर्षांपूर्वी पुढे आली. महापालिकेने केंद्रीय पर्यटन विभागाकडे प्रस्ताव पाठविला. केंद्र शासनाने तब्बल ३ कोटी रुपयांचे अनुदानही दिले. या अनुदानातून ३ एकर जागेवर गुलाबांच्या १४ पाकळ्यांमध्ये एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आले. उद्यानात सोफिया, ग्लॅडर, समरस्नो, स्कें टिमेंटा, क्रिसमिया, क्लासिक अ‍ॅक्ट, शॉकिंगब्ल्यू, अलिंका, अशा १३ वेगवेगळ्या स्वरूपाची झाडे लावण्यात आली आहेत.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढाकार घेऊन १५ आॅगस्टपासून उद्यान काही दिवस मोफत स्वरूपात सुरू करावे, असा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागांतून गुलाब पुष्पप्रेमींनी अलोट गर्दी केली. १७७४ जणांनी दिवसभरात उद्यानाला भेट दिली.
चार दिवसांमध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकांनी उद्यानाला भेट दिली. उद्यानात मोफत प्रवेश असल्याने गोळ्यांची नशा करणारे तरुण, गांजा ओढणारे, दारुडेही बिनधास्त आत शिरत आहेत. सुरक्षारक्षकांनाही न जुमानणारे तरुण मोठ्या संख्येने फिरत असून, उद्यानात आलेल्या नागरिकांना शिवीगाळही करीत असल्याच्या तक्रारी बऱ्याच वाढत होत्या.

खाजगी एजन्सी, तिकीट आवश्यक
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या रोझ गार्डनची देखभाल करणे मनपाला शक्य नाही. या क्षेत्रातील एखादी खाजगी एजन्सी नेमण्याचा विचार मनपाने यापूर्वीच व्यक्त केला आहे. एजन्सीने प्रवेश शुल्क लावून त्या उत्पन्नातून उद्यानाची देखभाल करावी, असाही निर्णय झाला. सध्या आचारसंहिता असल्याने मनपाने एजन्सी न नेमताच उद्यान खुले केले. त्यामुळे हा निर्णय लवकरच अंगलट येऊ शकतो.

अखेर उद्यानाला लावले कुलूप 
रोझ गार्डनमध्ये दारुडे, गोळ्यांची नशा करणारे तरुण मोठ्या प्रमाणात धुडगूस घालत होते. रविवारी चौथ्या दिवशी उनाड तरुणांचा रोष लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने उद्यानाला कुलूप लावणे पसंत केले. खाजगी एजन्सी नियुक्त करून आता उद्यान उघडले जाईल.

Web Title: Rose Garden closes on the fourth day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.