'Penalties for boys and girls talking at university ...'; Students protest over strange leaflets | 'विद्यापीठात मुले-मुली आपसात बोलले तर दंड...'; अजब पत्रकाचा विद्यार्थ्यांनी केला निषेध
'विद्यापीठात मुले-मुली आपसात बोलले तर दंड...'; अजब पत्रकाचा विद्यार्थ्यांनी केला निषेध

ठळक मुद्देविद्यार्थिनींनी परिपत्रक फाडून निषेध नोंदवला.प्रशासनाने आपण पत्रक लावलेच नसल्याचा दावा केला आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनी वसतिगृहांच्या गेटवरील परिपत्रकामुळे शुक्रवारी (दि.८) वाद निर्माण झाला. मुली-मुले आपसात बोलले तर दंडात्मक कारवाई करू, असा आशय असणारे हे परिपत्रक होते. विद्यार्थी संघटनांनी याविरोधात घोषणाबाजी करीत पत्रक काढणाऱ्यांचा निषेध नोंदवला. मात्र, अशा आशयाचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने लावलेच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हे परिपत्रक कोणी लावले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे यांच्या अध्यक्षतेत असलेल्या वसतिगृह व निवासस्थान समितीने मुलींच्या सहा वसतिगृहांना एकच प्रवेशद्वार असावे म्हणून शिफारस केली होती. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमॅट्रिक्स हजेरीचीही सोय करण्याचे समितीने म्हटले होते. हा निर्णय तीन महिन्यांनंतर अमलात आला आहे. आता दहा दिवसांपूर्वी एकच प्रवेशद्वार केले आहे. मात्र, तिथे मुले आणि मुली कामानिमित्त बोलत असतात. त्यावर तोडगा म्हणून प्रशासनाने मुली-मुलांना आपसात बोलण्यास मज्जाव करणारे परिपत्रक मुलींच्या वसतिगृहाच्या गेटवर लावले आहे. बोलताना आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला. 

परिपत्रकामुळे संतप्त होऊन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, स्टुडंट्स फेडरेशन आॅफ इंडिया, सत्यशोधक विद्यार्थी संघटनांनी संयुक्त आंदोलन केले. सर्व कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. विद्यार्थिनींनी परिपत्रक फाडून निषेध नोंदवला. दरम्यान प्रशासनाने आपण पत्रक लावलेच नसल्याचा दावा केला आहे. विद्यार्थिनींनी महिला सुरक्षारक्षकाला विचारले तर त्यांनी वॉर्डनकडे बोट दाखवले. बोलताना दिसल्यास मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करणे, फोटो काढून प्रशासनाकडे पाठवण्याचा अजब निर्णयही प्रशासनाने घेतल्याचे सुरक्षारक्षकांनी विद्यार्थिनींना सांगितले आहे.

Web Title: 'Penalties for boys and girls talking at university ...'; Students protest over strange leaflets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.