तोडगा नाहीच ! स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने मोफत धान्य वाटपाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 12:20 PM2021-05-03T12:20:02+5:302021-05-03T12:25:45+5:30

शिवसेना, भाजपा आमदारांना भेटून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे यांना रविवारी निवेदन देऊन शासनाकडे बाजू मांडण्याची मागणी केली

No solution! Free grain distributors break due to Ration distributors Bandha | तोडगा नाहीच ! स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने मोफत धान्य वाटपाला ब्रेक

तोडगा नाहीच ! स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने मोफत धान्य वाटपाला ब्रेक

googlenewsNext
ठळक मुद्देमहासंघाचे भाजपा, शिवसेना आमदारांना निवेदनमागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील १,८०२ स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनवरून धान्य वाटप विरोधासह विमा व इतर मागण्यांसाठी १ मेपासून संप पुकारल्यामुळे मोफत धान्य योजनेला ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्येच दुकानदारांनी संप सुरू केल्यामुळे प्रशासनाची कोंडी, तर रेशनच्या धान्यावरच दीनचर्या असलेल्या जनसामान्यांचे हाल होत आहेत.

शिवसेना, भाजपा आमदारांना भेटून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे यांना रविवारी निवेदन देऊन शासनाकडे बाजू मांडण्याची मागणी केली, तसेच वैजापूर तालुक्यातील दुकानदारांनी आ. रमेश बोरनारे यांच्याकडे निवेदनासह सर्व ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा केल्या. तहसीलदार गायकवाड यांनी संप मागे घेण्याची दुकानदारांना विनंती केली. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे तालुकाध्यक्ष व्यवहारे यांनी तहसीलदारांना सांगितले.
अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वात आमदारांना शासनाकडे मागण्या मंजूर करण्यासाठी पाठपुरावा यासाठी शिष्टमंडळ भेटले. यावेळी कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण, मिलिंद पिंपळे, ललित पाटणी, उमेश चुडीवाल, सचिन करोडे, अनिता मंत्री आदींची उपस्थिती होती.

अद्याप मागण्या मंजूर केल्या नाहीत
रेशन दुकानदारांच्या मागण्या अद्याप मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. आ. शिरसाट यांनी मागण्या रास्त असून, पुरवठामंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे नमूद केले, तर आ. दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलून याप्रकरणी बैठक घेण्याची सूचना केली. आ. सावे यांनी शासन आणि पुरवठा मंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. सोमवारी दोन्ही खासदारांना महासंघाचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

Web Title: No solution! Free grain distributors break due to Ration distributors Bandha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.